क्रिएटिव्ह ग्रुप चैत्रगौरी हळदी कुंकू मोठया उत्साहात साजरा

अध्यात्मिक

वेगवेगळया प्रकारच्या रांगोळींची आरास
पेण ः प्रतिनिधी
पेण देवआळीतील येथील क्रिएटिव्ह महिला ग्रुप मार्फत गेली 25 वर्ष चैत्रगौरी हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो. पेण शहरातील ब्राम्हवृंदा एकत्र करून हा हळदी कुंकुचा कार्यक्रम केला जातो. यावर्षी गोपाळकृष्ण हॉलमध्ये लग्नाची थिम ठेवून सजावट केली होती. साखरपुडा ते नववधु गृहप्रवेश या सर्व विवाहाच्या सोहळयांची रांगोळी रूपात सजावट केलेली पहायला मिळाली. यामध्ये फळ, भाजी, मीठ, तांदूळ, यांचा उपयोग सजावटीसाठी केलेला पहायला मिळाला. या हळदीकुंकूची तयारी वीस मार्च पासून सुरू केली आहे. या तयारीसाठी क्रिएटिव्ह ग्रुप दरवर्षी हिरहिरीने भाग घेतो आणि वेगवेगळी थिम ठेवून सजावट करतो. या वर्षी ही तशीच सजावट केलेली पहायला मिळाली.
चैत्रगौरी म्हणजे काय हे आपल्याला समजवून घ्यायचे आहे.
चैत्र महिन्यात मराठी स्त्रिया साजरा करीत असलेला एक पारंपरिक सोहळा आहे. स्त्रिया आपापल्या घरी हा समारंभ साजरा करतात. एका छोट्या पितळी पाळण्यामध्ये गौरीची स्थापना करतात, व महिनाभरातल्या कोणत्याही एका दिवशी आजूबाजूच्या स्त्रियांना हळदी कुंकवाला बोलावतात. कोकणात घरी आलेल्या स्त्रिया व कुमारिका यांचे पाय धुऊन त्यांच्या हातावर चंदनाचा लेप लावतात. भिजविलेले हरभरे आणि फळे यांनी त्यांची ओटी भरतात. तसेच कैरीचे पन्हे, कैरी घालून वाटलेली हरबर्‍याची डाळ देतात. गौरीची आरती करताना ’गौरीचे माहेर’ नावाचे एक गाणे म्हणतात. ही पद्धती कोकणात दिसून येते. घरातील मुली व स्त्रिया हळदी कुंकू करतात त्यावेळी चैत्रगौरीपुढे शोभिवंत आरास मांडण्याची पद्धतही काही ठिकाणी दिसून येते. तशाच प्रकारची आरास पेणमध्ये सुध्दा पहायला मिळाली. या महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे.
नैवेद्य
कैरी घालून वाटलेली हरबर्‍याची डाळ, कैरीचे पन्हे, बत्तासे, टरबूज, कलिंगड यासारखी फळे, भिजवलेले हरभरे असा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो.
चैत्रांगण
या निमित्ताने महिनाभर घराच्या अंगणात चैत्रांगण काढले जाते. देवीची शस्त्रे म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म आणि तिची वाहने म्हणजे गाय, हत्ती, कासव, नाग, गरूड होत. तिची सौभाग्याची लेणी म्हणजे फणी, करंडा, आरसा, मंगळसूत्र व सुवासिनींच्या ओटीचे ताट असून दारापुढे तुळशी वृंदावन, ॐ, स्वस्तिक, आंबा, श्रीफळ, उंबर- पिंपळ वगैरे पूजनीय वृक्ष ही हिंदू संस्कृतीची प्रतीके म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेले चैत्रांगण होय. अशा प्रकारचा चैत्रांगण गोपाळकृष्ण हॉल मध्ये पहायला मिळाला. एकूणच काय तर चैत्रगौरी हळदीकुंकू हा महिलांचा आवडता सण आहे. पेण मध्ये गेली 25 वर्ष ब्रम्हवृंदा क्रिएटिव्ह ग्रुपच्या माध्यमातून साजरे करत आहेत.