बुंद से गई वो हौद से नही आती

State

मजुरांच्या मुलांच्या भवितव्यांची जबाबदारी कोण घेणार? जेएसडब्ल्यू कंपनी की वन अधिकारी?
पेणःप्रतिनिधी
राजा अकबर आणि त्याचा वजीर बिरबल यांची बुंद से गई वो हौद से नही आती ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे. या गोष्टी प्रमाणेच जेएसडब्ल्यू स्टिल कंपनीचे सध्या धोरण सुरू आहे. कंपनीचा विस्तार करण्यासाठी कंपनीने कांदळवनाची मोठया प्रमाणात कत्तल केल्या बाबत न्यायालयात लवाद सुरू आहे. मात्र केलेली चुक दुरूस्त करण्यासाठी गेली तीन ते चार वर्ष कंपनी प्रशासन धडपड करत आहे. पहिल्यांदा धरमतर खाडी लगतच्या ग्रामपंचातींना सीएसआर ङ्गंडातून काही लाखांच्या रक्कमा देउन कांदळवन वाढवण्यास प्रवृत्त केले. परंतु यामध्ये कंपनी प्रशासनाला अक्षरशः अपयश आले. आता मात्र कंपनी प्रशासनाने आयडीयाची कल्पना लढवून परिमंडळ वन अधिकारी अलिबाग कांदळवन कक्ष यांना हाताशी पकडून पेणमध्ये दिव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात कांदळवनांची लागवड करण्यासाठीचे काम युध्द पातळीवर सुरू आहे.
दिव ग्रामपंचायतीच्या हद्दित बहिरम कोठक गावाच्या हद्दिमध्ये 100 ते 150 माणस कामाला लावून कांदळवन लागवडीसाठी काम सुरू आहे. मात्र हे काम कोणाचे सुरू आहे या बाबत ग्रामस्थांना काही ही माहित नाही. तेथे काम करणार्‍यां मजूरांना विचारणा केली असता त्यांनी पालघर जव्हार येथून आल्याचे सांगितले. त्यांना देखील कामाविषयी कोणतीही माहिती नाही. मात्र हे शेकडो कामगार आपल्या कुटुंबकबिल्या बरोबर आले आहेत. लहान लहान मुल त्या चिखलामध्ये काम करताना दिसत होते. दोन गोष्टी निश्र्चित या मुलांच्या शिक्षणाचे काय व या मुलांना बाल कामगार म्हणून राबवतात का? या विषयी विचारणा करण्यासाठी संजय जाधव परिमंडळ वनअधिकारी कांदळवन यांना भ्रमन्ती ध्वनी वरून विचारणा केली असता त्यांनी माझ्या वरिष्ठांशी बोला असे उत्तर दिले. तर या विषयी संजय जाधव यांचे वरिष्ठ अधिकारी समिर शिंदे यांच्याशी संपर्क केल्यानंतर समजले की, सदरील काम हे जेएसडब्ल्यू स्टिल कंपनीच्या सीएसआर (कंपनीची सामाजिक जबाबदारी) या विभागाकडून निधी वापरून केले जात आहे. काम कोणत्या ही निधी मधून होवो कांदळवन वाढणे काळाची गरज आहे. परंतु कांदळवन वाढवत असताना मजूरांच्या मुलांच्या भवितव्याचे काय? आज पालघर वरून शेकडो मजूर पेण येथे आणले आहेत. त्यांची मुल चिखलात त्यांच्या सोबत काम करत आहेत. ही बाब खुप गंभीर आहे. परंतु या बाबत वनखात्याचे अधिकारी बोलायला तयार नाहीत. तर जेएसडब्ल्यू स्टिल कंपनीच्या सीएसआर विभागाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना संपर्क होउ शकला नाही. मात्र जनसंपर्क कार्यालयातून माहिती घेउन सांगतो असे सांगण्यात आले. तर सदरील रोप वाटीकेच्या कामाला बहिरमकोठक ग्रामस्थांचा सुध्दा विरोध आहे. कारण त्यांचे म्हणणे आहे की, ही जागा आमच्या गावाची गुरचारण आहे. जर या जागेवर कांदलवन लावल्यास आमची गुर ढोर कोठे चरणार. तसेच वनखात्याने आम्हा स्थानिकांना विश्र्वासात न घेता दंडेल पध्दतीने काम सुरू केला आहे. ते आम्हाला मान्य नाही.
एकंदरीत कांदळवन वाढणे काळाची गरज आहे. परंतु कांदळवनांची लागवड होताना आदिवासी मुलांचे भवितव्य अंधारात येत असेल तर, ही बाब योग्य नाही. तसेच वनखात्यानेही स्थानिकांना मर्जीत घेणे गरजेचे होते. परंतु तसे केले गेले नाही आणि ज्यांच्या सीएसआर ङ्गंडातून हे कांदळवन लागवडीचे काम सूर आहे त्यांनी या अगोदर नष्ट केलेल्या कांदळवनाचे काय? हा ही प्रश्र्न सध्या स्थानिकांना पडला आहे.