पेण ः प्रतिनिधी
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि वैकुंठ पाटील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जय भवानी वाशी आणि वरसुआई वाशी यांच्या सहकार्याने रायगड जिल्हा अजिंक्य प्रौढ पुरूष व महिला गटाची निवड चाचणीच्या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी खासदार सुनील तटकरे छत्रपती संभाजी महाराज मैदान वाशी वढाव रोड येथे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कबड्डीत दम आणि संयम महत्वाचा असतो ज्याला दमावर व संयमावर नियंत्रण ठेवता आले तो कबड्डीमध्ये यशस्वी होतोच. कबड्डीत दम टिकवणे महत्वाचे आहे. जो दम टिकवतो त्याला कधीच अपयश येत नाही. त्यामुळे दम आणि संयम या दोन्ही गोष्टी कबड्डीप्रमाणे आयुष्यातही महत्वाच्या आहेत. ज्याला दम टिकवतो येतो तो कोणत्याही क्षेत्रात मागे राहत नाही वैकुंठ पाटील उशीरा का होईना कबड्डीकडे वळले आहेत. परंतू त्यांना कबड्डीचे नियम थोडे समजावून घ्यावे लागतील. चवडयावर पक्कड कशी करायची दोन कोपरा रक्षकांचे व मध्य रक्षकांची नजर चुकवून गुण कसा मिळवायचा. हे समजून घेणे गरजेचे आहे. आणि ते समजदार आहेत. ते समजून घेतीलच मी आज राष्ट्रवादीचा खासदार म्हणून कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आलो नाही तर महाराष्ट्र असोसिएशनचा उपाध्यक्ष म्हणून येथे आलो आहे.
पुढे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, जिल्हा अजिंक्य पदाच्या स्पर्धा आज वाशी परिसरात भरवून वैकुंठ पाटील यांनी चांगला अध्याय कबड्डी क्षेत्रातील सुरु केला आहे. आज क्रिकेटच्या अति खेळामुळे कबड्डी कडे दुर्लक्ष होत आहे. मात्र कबड्डीचा टॅलेंट हा ग्रामीण भागात आहे. कोण कोठे जन्माला येतो त्या पेक्षा तो आपल्या जन्मभूमीसाठी काय करतो हे महत्वाचे आहे स्व.विजय म्हात्रे यांचे नाव घेतल्याशिवाय रायगड कबड्डीचा इतिहास लिहिला जाणार नाही. त्यांना महाराष्ट्र संघाचा नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्यांनी क्रिडा क्षेत्रातील मानाचा शिव छत्रपती पुरस्कार देखील त्यांनी आपल्या कतृत्वाने पटकावला. त्यामुळे कबड्डीकडे राजकारण विरहीत पाहणे गरजेचे आहे असे शेवटी खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैकुंठ पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सचिव अस्वाद पाटील, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्यवाहक चित्रा पाटील, जे.जे. पाटील, दयानंद भगत, शरद कदम, जितू ठाकूर, विजय कदम, योगेश पाटील यांच्यासह क्रिडाप्रेमी पुर्ण स्पर्धेच्या नियोजनाची जबाबदारी मिलिंद पाटील यांनी आपल्या खांदयावर घेतली असून मिलिंद पाटील हे कबड्डीचे राष्ट्रीय समालोचक असल्याने जिल्हयातील प्रत्येक कबड्डी संघाशी त्यांची नाल जोडली असल्याने मोठयाप्रमाणात या स्पर्धेत कबड्डी संघांनी सहभाग घेतला आहे. तसेच कार्यक्रमाचे पूर्ण सुत्रसंचालन मिलिंद पाटील यांनी केले.
ही स्पर्धा 7 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी, 9फेब्रुवारी अशी तीन दिवस चालणार असून या स्पर्धेचे बक्षिस वितरण खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवीशेठ पाटील आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जयंत भाई पाटील यांच्या हस्ते होणार आहे.