अखेर सत्याचा विजय झाला :- संतोष श्रृंगारपुरे

Raigad


पेणः प्रतिनिधी

नगरविकास आघाडीचे गटनेते संतोष श्रृंगारपुरे यांनी स्विकृत सदस्याच्या निवडी बाबत साप्ताहिक गर्जा रायगडशी बोलताना सांगितले की, सत्याचा विजय झाला आहे. सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही. असे सांगून पुढे त्यांनी सांगितले की, पेण नगरपालिकेची सर्व साधारण समा १६ जानेवारी २०२६ रोजी संपन्न झाली. या समेमध्ये उपनगराध्यक्ष व ३ स्विकृत नगरसेवकांची निवड करणे गरजेचे होते. परंतु उपेंद्र अनंत कोलाडकर यांची निवड पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा यांनी नियमांचा विचार न करता केली नाही व त्यांच्या निवडीवर स्थगिती आणली. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आणि जिल्हाधिकारी किसनराव जावळे यांनी १९/०१/२०२६ रोजी नगराध्यक्षांच्या नावे आदेश काढला आहे. या आदेशामध्ये नियमांचा काटेकोर उल्लेख केला आहे तो असा.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारण) अध्यादेश २०१६ नुसार निवडून आलेल्या अध्यक्षांना उपाध्यक्ष निवडीबाबत आणि इतर सर्वसाधारण मुद्यांबाबत खुलास्यानुसार नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन परिपत्रक पत्र क्र. संकिर्ण-२०१६/प्र.क्र.४६६/नवि-२०, दिनांक २१ डिसेंबर २०१६ मध्ये मुद्दा क्र. ६ मधील “उ” मध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नामनिर्देशनाची पध्दत कशी असे याबाबत खालीलप्रमाणे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.
“उ” नुसार पदनिर्देशित अधिकारी प्राप्त नामनिर्देशक शिफारस पत्र व अहंतेची पुरावे यांची छाननी करून अहंता प्राप्त उमेदवारांची यादी संबंधित पक्ष/गट/आघाडी प्रमुखाकडे पाठवून त्यांची प्रत थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांकडे पुढील कार्यवाहीकरिता बैठकीपुर्वी पाठवेल. पदनिर्देशित अधिकाऱ्यांने वैधतेबाबत घेतलेला निर्णय अंतिम असेल व छाननी अंती अहंता ठरलेल्याच व्यक्तींची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची नगराध्यक्षांवर बंधनकारक असेल. असे आदेश दिले असून या आदेशाने उपेंद्र कोलाडकर यांची नियुक्ती करणे आता नगराध्यक्षांना क्रमप्राप्त आहे असे शेवटी संतोष श्रृंगारपुरे यांनी सांगितले.