एप्रिल अखेर निवडणुका?

Political

जिल्ह्यातील 351 ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता,मतदान याद्या अद्ययावत करण्यासाठी प्रशासन लागले कामाला
पेण ः- प्रतिनिधी
जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील 351 ग्रामपंचायतींच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम सुरु झाला आहे. प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. 26 मार्चपर्यंत प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासकीय राज सुरु आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका कधी होणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. अखेर ही उत्कंठा संपण्याच्या मार्गावर आहे. मुदत संपणार्‍या, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्याने तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत, अशा जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि 111 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानुसार मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये प्रभागनिहाय प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करणे, हरकती व सूचना दाखल करण्याचा कार्यक्रम 24 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. त्यानंतर 26 मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. तलाठ्यांपासून सर्वच मंडळी मतदार यादी तयार करण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत. त्यानंतर एप्रिलअखेर ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविले आहे. या ग्रामपंचायतींचे मतदान मे मध्ये होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पेण तालुक्यातील एकूण 18 ग्रामपंचायतींचे निवडणूका असून यामध्ये (गागोदे खुर्द, करंबेळी, कासू, अंतोरे, जावळी, पाबळ, वरेडी, बेणसे, शिहू, कुहिरे, झोतीरपाडा, वढाव, शिर्की, उंबर्डे, कांदळे, रावे, शेंडोशी, जिर्णे) या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. त्यामुळे पेण तालुक्यात भर उन्हाळयात राजकीय वातावरण तापून गाव पुढार्‍यांची धावपळ सुरू होणार. तर आरक्षणाची भिजती घोंगडी पाहता पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणूका गणपती नंतर होण्याची दाट शक्यता आहे.