हा दोष कुणाचा?

aagrhlekh

बुधवार दि.18 डिसेंबर रोजी संध्याकाळी चार च्या सुमारास नीलकमल बोटीचा अपघात झाला आणि क्षणार्धात 110 प्रवाशांपैकी 14 जणांना आपले जीव गमवावे लागले. नक्की अपघातामध्ये दोष कुणाचा हे सांगणे कठीणच. परंतु काळाने 14 जणांवर घाला घालून या नश्र्वर जगातून कायमचा निरोप घेण्यास भाग पाडले. यामध्ये दोन तर चिमुकले होते. त्यांना या दुनियेची ओळख ही झालेली नव्हती. अपघात झाला आणि हेल्प हेल्प वाचवा वाचवा जिवाच्या अकांताने प्रत्येक जण ओरडत होते. पण व्यर्थ दूरदूरपर्यंत नजर जाईल इतका अथांग सागर पसरलेला असताना स्पीड बोट प्रवासी बोटीला कशी धडकली? हा अपघात कसा घडला? असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. एका प्रत्यक्षदर्शीने या अपघाताचा शूट केलेला व्हीडिओ समोर आला आहे. त्यावरून हा अपघात किती भीषण होता याची कल्पना येते. एलिफंटाला चाललेल्या नीलकमल या प्रवासी बोटीला स्पीड बोट धडकली. ही स्पीड बोट नौदलाची होती. नौदलाकडून हा अपघात कशामुळे झाला? त्याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आले. नौदलाने सांगितले की, मुंबई बंदरात स्पीड बोटीच्या इंजिनची चाचणी सुरू होती. त्यावेळी इंजिनमध्ये बिघाड झाल्याने स्पीड बोटीचे नियंत्रण सुटले व स्पीड बोट नीलकमल बोटीला येऊन धडकली. मात्र समोर आलेल्या व्हीडियोमध्ये स्पीड बोट नीलकमल बोटीपासून काही अंतरावर समुद्रात राऊंड मारताना दिसते. स्पीड बोट टर्न झाल्यानंतर पूर्णपणे ती अनियंत्रित झाली व नीलकमल बोटीला धडकली. या अपघातामुळे मुंबई, ठाणे, रायगड भागांत हळहळ व्यक्त केली जात असतानाच नाशिक जिल्ह्यावरही या अपघाताचे पडसाद उमटले. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावच्या आहेर दाम्पत्यांसह चिमुकल्याचा मृत्यू झाला. म्हणजे संपूर्ण कुटुंबच उद्धस्त झाले. आजारावर उपचारासाठी पिंपळगावच्या राकेश नाना आहेर हे दोन दिवसांपूर्वी पत्नी व मुलासह मुंबई येथे गेले होते; परंतु बोट दुर्घटनेत आहेर कुटुंबीयांचा बळी गेला. त्याच प्रमाणे गोव्या वरून मुंबईला आलेली पठाण कुटुंबिय दोन दिवसासाठी आपल्या बहिणीकडे वास्तव्याला होते. कुलाब्या वरून खरेदी करून बोटीत फीरण्याचा आनंद घ्यायला गेले आणि हा आनंद 6 वर्षाच्या चिमुरडीच्या जिवनातला शेवटचा आनंद ठरला. अपघाताची चौकशी करताना नौदलाकडूनच स्पष्ट करण्यात आले की, नीलकमल बोटीला धडक देणार्‍या नौदलाच्या स्पीड बोटीचे इंजिन नुकतेच बदलण्यात आले होते. त्यामुळे या बोटीची चाचणी सुरू होती. अशा चाचणी दरम्यान बोट आठ आकड्याच्या आकारात समुद्रातून फिरवली जाते. मात्र, दुर्दैवाने याचवेळी इंजिनमध्ये बिघाड झाला आणि चालकाचा बोटीवरील ताबा सुटून ही स्पीडबोट नीलकमल बोटीवर आदळली. या बोटीवर नौदलाचे 2 जवान आणि या बोटीला इंजिन पुरवणार्‍या कंपनीचे 4 कर्मचारी उपस्थित होते. प्रचंड वेगात ही स्पीडबोट आदळल्याने स्पीडबोटीवरील तिघांचा मृत्यू झाला. या स्पीडबोटीच्या प्रचंड वेगामुळे नीलकमल बोटीला मोठी भेग पडली. जणू तिचे दोन तुकडे झाल्याप्रमाणे तिची स्थिती झाली. स्पीडबोटचाही चक्काचूर झाला. एव्हाना नीलकमल बोटीमध्ये पाणी शिरू लागले. त्यामुळे प्रवासी प्रचंड घाबरले. त्यांची तारांबळ उडून पळापळ सुरू झाली. या घटनेची माहिती कळताच शेजारील अन्य बोटी, नौदल आणि कोस्टगार्डच्या बोटींसह नौदल हेलिकॉप्टरने तत्काळ बचाव कार्य सुरू केल्याने 99 जणांना वाचवण्यात यश मिळाले. नीलकमल बोटीवरील 5 खलाशी सुरक्षित आहेत. नीलकमल बोटीत वेळेत लाईफ जॅकेट दिले नसल्याचा आरोप बोटीतून बचावलेल्या एका प्रवाशाने केला. अपघात झाल्यानंतर पाणी बोटीत शिरल्यानंतर लाईफ जॅकेट दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान बोटीत पुरेशी लाईफ जॅकेट उपलब्ध नव्हती, अशी माहितीही काही प्रवाशांकडून प्राप्त झाली. लाईफ जॅकेट प्रवासी बोटीवर असती तर कदाचित मृतांना वाचविणे शक्य झाले असते. नौका चालकासह इतरांवर हा गुन्हा दाखल केला आहे. परंतु ज्या होडी मालकाने जेवढे प्रवासी तेवढे लाईफ जॅकेट ठेवणे गरजेचे होते. त्याला ही जबाबदार धरणे गरजेचे आहे. तसेच दर महिन्याला बोटीचा नुतनीकरण परवाना काढला जातो या नुतनिकरण परवानाच्या वेळी होडीतील लाईफ जॅकेट चेक करणे निरिक्षकाचे काम होते परंतु त्यांनी देखील लाईफ जॅकेट चेक केले होते का? हा ही संशोधनाचा विषय आहे. बचावलेले नथाराम चौधरी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. आता चौकशी करण्यात येईल. दोषींना शासन होईल. पण अपघातात ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या घरावर शोककळा पसरली आहे. त्यांचे काय? पाच लाखांच्या मदतीने ही पोकळी भरून निघणार आहे का? नौदलाच्या बोटींना सराव करताना खबरदारी घेणे आवश्यक होते. तसेच प्रवासी सुविधा देणार्‍या बोटीच्या मालकानेही माफक प्रमाणावर लाईफ जॅकेट ठेवणे आवश्यक होते. तसेच समुद्रात अपघात घडल्यावर तत्काळ मदत मिळणे आवश्यक आहे. रस्त्यावरील अपघात आणि सागरातील अपघात यात कमालीचा फरक आहे. रस्त्यावरील अपघातात रुग्णवाहिका तसेच अन्य मार्गाने मदत देता येते. पण सागरातील अपघात थेट खोल पाण्यातच होत असल्याने काही मिनिटांतच होत्याचे नव्हते होते. नीलकमलच्या अपघातातही तेच घडले. लाईफ जॅकेटचा तुटवडाप्रकरणी नीलकमलचा मालक, नौदलाच्या स्पीड बोटीवरील चालक तितकेच जबाबदार असून मदतीस झालेला विलंब याचीही यानिमित्ताने चौकशी होणे आवश्यक आहे. घटनेतून बोध घेत प्रशासनाने सागरात योग्य ती उपाययोजना तातडीने करावी. अन्यथा गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा तसेच उरण या भागात ये-जा करणार्‍या प्रवासी बोटीतून प्रवास करणे म्हणजे मृत्यूसोबत घेऊन सागरी प्रवास करण्यासारखे होईल. भविष्यात जेवढे प्रवाशी तेवढे लाईफ जॅकेट ठेवणे क्रमप्राप्त व्हावे अन्यथा असाच मृत्यू चा तांडव पहायला मिळाल्यास नवल नसावे.