पेणःप्रतिनिधी
गेल्या पाच वर्षात पेण शहर झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे पेण शहराच्या विकासाचा विचार करता पेण शहराच्या बाजुने वेगवेगळे पाच रिंगरोड मंजूर झाले आहेत. काही प्रमाणात त्या रिंगरोडची कामे देखील झालेली आहेत. रिंगरोडसाठी लागणार्या जागेला काही शेतकर्यांनी विरोध केला आणि त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ही थोटावले. परंतु काही असे ही शेतकरी आहेत की, ज्यांना पेणचा विकास व्हावा असे मनोमन वाटते. त्यांनी रिंगरोडला विरोध न करता आपापल्या जागा दयायला तयार झाले. परंतु त्यांची माफक एवढीच अपेक्षा होती की नगरपालिका प्रशासनाने रितसर त्यांच्या जागेचा ताबा घ्यावा व मिळणार्या चटई क्षेत्राविषयी विचारविनिमय करावे. परंतु अधिकारी मनमानी कारभार करत असून अशाच काही शेतकर्यांना विश्र्वासात न घेता त्यांच्या जमिनीचा ताबा घेतला असून त्यावर रस्त्याचे काम ही पुर्ण केले आहे. असाच प्रकार सर्वे नं. 379 अ/3 मध्ये झाला आहे. सदरील जागा प्रशांत यशवंत टिळक व त्यांच्या कुटुंबियांची असून त्यामध्ये साधे कुळ म्हणून ढवळे, गुरव, प्रधान, शिरसागर, अदी आहेत. मात्र नगरपालिका प्रशासनाने या जागेचे मुळ मालक प्रशांत टिळक यांच्या बरोबर कोणतेच कायदेशीर दस्त तयार केले नाहीत. ज्या वेळेला प्रशांत टिळक यांनी आपल्या जागेत केलेल्या रस्त्या बाबत नगरपालिकेने कोणता पत्र व्यवहार आपल्या सोबत केलेला आहे व संमती पत्र घेतला आहे का? या बाबत 11 नोव्हेंबर 2024 रोजी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली त्या वेळेला नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या कर्मचार्यांनी आयडीयाची कल्पना लढवून 25 नोव्हेंबर 2024 रोजी घाईघाईने जमिनीचे साधे कुळ असणार्या ढवळे कुटुंबियांकडून संमतीपत्र तयार करून घेतला. तो पुर्णताः चुकीच्या पध्दतीचा दिशाभूल करणारा होता. कारण संमतीपत्र हा जमिन मालका बरोबर होणे गरजेचे होते त्या नंतर तो कुळांसोबत केला गेला असता परंतु असे न होता नगरपालिका प्रशासनाच्या बांधकाम विभागाने चुकीच्या पध्दतीने संमतीपत्र घेतला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे संमतीपत्र घेण्यासाठी वापरण्यात आलेला स्टॅम्प पेपर हा नगरपालिकेच्या अधिकृत कर्मचार्यांनी घेणे गरजेचे होते परंतु तसे न होता सहा महिन्यासाठी प्रशिक्षणार्थी असलेल्या सौरभ थळे याला स्टॅम्प पेपर घेण्यास सांगितले. स्टॅम्प पेपर घेताना सदरील स्टॅम्प पेपर कोणत्या कामासाठी घेतला जात आहे हे ही नमुद करणे गरजेचे होते. तसेच 25 नोव्हेंबरला संमतीपत्र करण्यात आले आहे. परंतु स्टॅम्प पेपरची खरेदी ही 26 नोव्हेंबर रोजी झाली आहे. हे ही आश्र्चर्य जनकच आहे. तसेच मुद्रांक विक्रेते दिनेश पाटील यांनी सांगितले की, ज्या कामासाठी स्टॅम्प वापरला जातो त्याविषयी आम्ही विचारणा करतो सरकारी कार्यालयासाठी स्टॅम्प पेपर लागत असेल तर त्या कार्यालयाचा अधिकृत माणूस त्या कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकार्याचा संमतीपत्र देणे गरजचे असते. परंतू आमच्याकडून जो स्टॅम्प विकत नेलेला आहे तो खाजगी कामासाठी नेल्याचे नमुद आहे याचाच अर्थ संमतीपत्र करताना नगरपालिका प्रशासनाने काय प्रकार केला आहे हे ध्यानात येते. त्यातच टिळक, आंद्रे, शिंदे, यांच्या जागेतून 18 मिटरचा रस्ता करण्यात आला आहे. मात्र पुढे दोन घर रस्त्यात आहेत. त्यांना साधी नोटीस देण्याचीही तसदी नगरपालिका प्रशासनाने दाखवली नाही ही बाब देखील आश्र्चर्य जनकच आहे. कारण बोरगाव रस्त्याच्या शेजारून पुढे जाणार्या रिंगरोडला एक बाजुला हिरव्या कलरचा बंगला असून दुसर्या बाजुला निळया कलरची पत्र्यांची शेड आहे याच्या मधोमध असणारी जागा ही सात ते आठ मिटरच आहे. बंगला शेड हे रस्त्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र ही बाब नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिसत नाही याचेच नवलं. एकंदरीत काय तर विकासाला अडथळा आणणार्यांविरूध्द प्रशासन भ्र शब्द काढायला तयार नाही. मात्र विकासाला मदत करणार्यांना हेतूपुरस्तर त्रास देणे सुरू आहे.
रस्त्याला माझा विरोध नाही परंतु मला गृहीत धरले गेले ः-प्रशांत टिळक
शहराच्या विकासाला माझा कधीच विरोध नसणार आहे. परंतु नगरपालिका प्रशासनाच्या अधिकारी वर्गाने दंडेलपणे माझ्या जागेवर अतिक्रमण करून रस्ता एक ते दिड वर्षापूर्वी केला आहे. साधे मला विचारले देखील नाही. ते मला मान्य नाही तसेच संमती अथवा जमिनीची ताबा पावती न करता माझ्या जागेतील झाडे ही तोडली आहेत. हे नगरपालिकेचे चुकीचे आहे. मी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितल्या नंतर चुकीच्या पध्दतीने ताबा पावती मला दाखविण्यात आली. या बाबत मी नगरपालिका प्रशासनाला न्यायालयात खेचल्याशिवाय राहणार नाही. मी रस्त्याला जागा देत असताना देखील नगरपालिका प्रशासन कर्मचारी अशा प्रकारे आरेरावी करत असतील तर ते मी खपवून घेणार नाही.
तोंडी ताबा पावती दिली होतीः विनायक बनसोडे, बांधकाम अभियंता पेण नगरपालिका
रिंगरोडच्या जागा संपादन आणि कामा संदर्भात बांधकाम अभियंता विनायक बनसोडे यांना विचारणा केली असता त्यांनी आपली चुक लपविण्यासाठी सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की मालकाने तोंडी सहमती दिली होती. त्यावर आमच्या प्रतिनिधीने विचारले तोंडी परवानगी केव्हा दिली होती? कोणत्या मालकाने दिली होती? प्रशांत टिळक, संदीप टिळक, मृणाल भिडे, विजया टिळक, या वर विनायक बनसोडे यांच्याकडे काहीही उत्तर नव्हते. महत्त्वाची बाब म्हणजे तोंडी संमती घेउन विकास काम होत असती तर रिंगरोडची काम का थांबली असती? तसेच प्रशांत टिळक यांनी कोणत्याही प्रकारची तोंडी संमती दिली नव्हती हे देखील त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.