पेण :-मुस्कान खान
खारेपाट विभागाच्या पाचवीला पाणी प्रश्र्न पुजलेला आहे. गेली आठवडाभर या विभागात दुर्गंधी युक्त पाणी पुरवठा होत असल्याने वाशी ओढांगीसह खारेपाटातील जनता हैराण झाली आहे.
खारेपाट विभागासाठी शहापाडा धरणातून पाणी पुरवठा होत असून रायगड जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हा पाणी पुरवठा करत आहे. मात्र अगदी स्वतंत्र पुर्व काळापासून खारेपाटाला मिळालेला शाप म्हणजे दुषित पाणी,दुर्गंधी युक्त पाणी, अपुरे पाणी या सर्व बाबींमुळे दरवर्षी पाणी प्रश्न ऐरणीवर येत असून, अगदी 1960 पासून आजपर्यंत निवडणूकीचा मुद्दा हा खारेपाटाचा पाणी प्रश्न असतोच. मात्र जवळपास 65 वर्ष उलटून गेले तरी, आजही खारेपाटातील पाणी प्रश्न पुर्ता सुटलेला नाही. लोकप्रतिनिधींनी आश्र्वासना पलीकडे आणि भाषणांपलिकडे खारेपाटाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 100 टक्के प्रयत्न केले नाहीत. आजच्या स्थितीला खारेपाट विभागात दोन दिवस आड पाणी पुरवठा केला जात असून तो ही कमी दाबाने होत आहे. गेली आठवडाभर जो काही पाणी पुरवठा होत आहे तो दुर्गंधी युक्त पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी पिणे तर दूरच अन्न शिजवण्यासाठी देखील या पाण्याचा उपयोग करता येईना. या दुर्गंधी युक्त पाण्यामुळे वाशी व ओढांगी विभागात पोटाच्या आजारात वाढ झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. या विभागाच्या जनतेने अखेर या विभागात अशा प्रकारचा पाणी पुरवठा करूच नका असा पवित्रा घेतला आहे. मात्र याचा काहीच परिणाम अधिकारी वर्गावर पडलेला दिसला नाही.
चहा, भात, यांना देखील दुर्गंधीचा वास येत आहे :-जितेश पाटील, ओढांगी ग्रामस्थ
ओढांगी ग्रामस्थ जितेश पाटील यांनी गर्जा रायगडशी बोलताना सांगितले की, गेली आठवडाभर पाण्याचा जी दुर्गंधी येत आहे त्यामुळे अनेकांचे आरोग्य बिघडलेले आहे. त्याच प्रमाणे चहा व भात व इतरही पदार्थ या पाण्यात केल्यास त्याला ही वास येत आहे. आजच्या घडीला सर्व सामान्य नागरिकांना विकतचे पाणी घेणे परवडत नाही. तरी देखील आपले आरोग्य बिघडू नये म्हणून नागरिक पदरमोड करून जारचे पाणी विकत घेत आहेत. आम्हाला तर दाट संशय येत आहे की, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि हे पाणी विक‘ेते यांच्यामध्ये काही तरी संगनमत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रदूषित पाणी आम्हाला पुरविले जात आहे. या षडयंत्राविरूध्द आम्ही रस्त्यावर उतरून लढाई देण्याच्या तयारीत आहोत.
पाईप लिकेज झाल्यामुळे दुर्गंधी येते लिकेज काढणे युध्दपातळीवर सुरु आहे. ः-आर.एम.राठोड, अभियंता
जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा शाखेचे अभियंता आर.एम. राठोड यांना भ‘मंती ध्वनीवरुन संपर्क करुन दुर्गंधी पाण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पाईप लाईन लिकेज झाल्याने बाहेरील पाणी पाईपमध्ये शिरत असून त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्हाला समजताच तो लिकेज शोधून काढला असून, त्या लिकेजेचे दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. लवकरात लवकर लिकेज काढून पाणी पुरवठा पूर्ववत होईल.
एम.जी.पी च्या लिकेज मुळे दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा झाला ः- रवी पाचपोर, उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा
दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा झाल्याबद्दल पहिल्यांदा मी नागरिकांची दिलगीरी व्यक्त करतो. परंतू ज्या काही समस्या झाल्या त्या एम.जी.पी च्या लिकेज पाईप लाईनमुळे झाल्या आहेत. त्या आम्ही सुधारल्या असून या पूढे असा प्रकार होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेत आहोत तसेच पूर्ण लाईनवर देखरेख करण्यासाठी एका कर्मचार्याची नेमणूक केली आहे.