आयोजकांच्या मेहनतीवर पंचांनी फिरवले पाणी

क्रीडा

पेणःप्रतिनिधी
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि वैकुंठ पाटील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जय भवानी वाशी आणि वरसुआई वाशी यांच्या सहकार्याने रायगड जिल्हा अजिंक्य प्रौढ पुरूष व महिला गटाची निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज मैदान वाशी वढाव रोड येथे दिनांक 7 ते 9 फेब्रुवारी या दरम्यान पार पडले. या स्पर्धेसाठी आयोजक वैकुंठ पाटील मित्र मंडळाने ना भुतो ना भविष्य अशी मेहनत घेतली. जिल्हयातील खासदार, आमदार, मंत्री यांनी स्पर्धेला हजेरी लावली. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या आजवरच्या कारकिर्दीत अशी भव्य दिव्य निवड चाचणी झाली नाही. मात्र एवढया नेट नेटक्या आयोजनाला गालबोट लावले ते म्हणजे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सामना अधिकार्‍यांनी. पहिल्या दिवसा पासूनच पंचांच्या ढिसाळ कारभारामुळे खेळाडू आणि पंचांमध्ये तू तू मै मै झाली. परंतु आयोजकांचे मान राखून आणि असोसिएशनच्या ज्येष्ठ पदाधिकार्‍यांचा मान राखून खेळाडूंनी नरमाईची भुमीका घेतली. परंतु स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी देखील पंचांचा ढिसाळ कारभार सुरूच होता. याचा फटका अनेक नामवंत संघांना बसला. या पूर्वी देखील पंचांचा मार्गदर्शन शिबीर घ्यावा असा प्रसार माध्यमांनी आपल्या लेखनीतून मागणी केली होती. परंतु याकडे जिल्हा असोसिएशनने दुर्लक्ष केल्याने पंचांची बेजबाबदारपणाची कामगीरी सुरूच राहिली.
सध्या सोशल मिडीयावर एक क्लिप जोरदार व्हायरल होत आहे ती म्हणजे, शिवशंभो पाटणेश्र्वर आणि वेश्र्वी या संघातील निर्णयाची. त्या क्लिप मध्ये स्पष्ट दिसत आहे शिव शंभो पाटणेश्र्वर संघाच्या खेळाडूने आपल्या हाताने मध्य रेषा पार केलेली आहे. परंतु पंचांच्या बेजबाबदारपणामुळे वेश्र्वी संघाचे चार गडी बाद देण्या ऐवजी पाटणेश्र्वर संघाचा खेळाडू बाद दिला गेला आणि यामुळे मोठया प्रमाणात मैदानावर गोंधळ झाला. या गोंधळाचा परिणाम शिवशंभो पाटणेश्र्वर संघाला मॅच गमवावी लागली. असा प्रकार फक्त पाटणेश्र्वर पूर्ता मर्यादित राहिला नाही तर इतर ही सामनांच्या वेळेला पहायला मिळाला. त्यामुळे सध्या तरी जिल्हा असोसिएशन सामना अधिकार्‍यांचे आत्मचिंतनाचे शिबीर घेणे गरजेचे आहे.