पेणःप्रतिनिधी
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि वैकुंठ पाटील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जय भवानी वाशी आणि वरसुआई वाशी यांच्या सहकार्याने रायगड जिल्हा अजिंक्य प्रौढ पुरूष व महिला गटाची निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज मैदान वाशी वढाव रोड येथे दिनांक 7 ते 9 फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे. त्यामुळे तीन दिवस पेणसह रायगडकरांना कबड्डीचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
या स्पर्धेचे प्रमुख आयोजक वैकुंठ पाटील हे गेली आठ दिवस या अंजिक्य निवड चाचणीची तयारी करत असून या स्पर्धेत 192 पुरुष संघ व 32 महिला संघाचा समावेश आहे. 50 पंचांच्या देखरेखीखाली या स्पर्धा होणार आहेत. एकूण 6 क्रीडांगण तयार करण्यात आली असून 5,000 ते 10,000 प्रेक्षक क्षमता अपेक्षित धरुन गॅलरीसह व्यवस्था करण्यात येणार आहे. व्हीआयपी व इतर वाहनांसाठी 3 गेट असून पार्किंग व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जयंतभाई पाटील, चित्राताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होणार असून यापूर्वी विजेत्या व उपविजेत्या संघांना फिरते चषक देण्यात येत होते . यावर्षी आणखी एक एक चषक देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पुरूषांसाठी शिव छत्रपती पुरस्कार विजेते स्व.विजय म्हात्रे यांच्या नावाने तर महिलांसाठी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदार स्व.प्रमोद ठाकूर यांच्या नावाने फिरते चषक देण्यात येणार आहे. अशी माहिती वैकुंठशेठ पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
या स्पर्धेदरम्यान राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील, लोकसभा खासदार सुनील तटकरे, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, मंत्री आदिती तटकरे, मंत्री भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार जयंतभाई पाटील, चित्राताई पाटील, चित्राताई वाघ व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती वैकुंठ पाटील यांनी दिली.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वतः वैकुंठ पाटील, मिलींद पाटील, जे.जे.पाटील, छत्रपती पुरस्कार विजेते सुर्यकांत ठाकूर, संजय मोकल, हिरामण भोईर, निलेश पाटील, सचिन पाटील यांच्यासह जय भवानी वाशी आणि वरसुआई वाशी अदींनी मेहनत घेतली आहे.
