बचत गटांच्या नावाखाली खासगी सावकारीला उत

Crime

पेणःप्रतिनिधी
पेण शहरासह तालुक्यात आज अवैध्य सावकारीला उत आला असून मोठया प्रमाणात सावकारी धंद्याने हातपाय पसरले आहेत. महत्वाची बाब म्हणजे हा सावकारी धंदा महिला वर्गा कडून केला जात आहे. काही महिला बचत गटाच्या नावाने शासनाकडून कर्जाऊ रक्कम घेतात आणि याच रक्कमा नंतर काही गरजू व्यक्तींना देतात आणि या गरजू व्यक्तींकडून या महिला पाच ते दहा रुपये शेकडा दरमहा व्याज या प्रमाणे पैसे घेतात. एकंदरीत काय तर शासनाच्या बचत गटांसाठी येणार्‍या योजनांचे पैसे काही लालची महिला अवैध्यरित्या व्याजी पैसे लावून आपला गोरख धंदा करत आहेत.
बँकांचा व्याज पाहता द.सा.द.शे 10 टक्क्यापासून 12 टक्क्यापर्यंत आहे. परंतु अवैध्यरित्या सुरू असलेल्या या महिला सावकारांकडून दर महिन्याला 5 टक्क्यांपासून 10 टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जाते. म्हणजेच द.सा.द.शेे 60 रुपयापासून 120 रूपयापर्यंत व्याज आकारले जात आहे. एकंदरीत विचार केला तर चक्रवाढ व्याजापेक्षा ही हा महाभयानक व्याज आहे. व्याजी पैसे घेणार्‍यांचे कधी पैसेच फिटत नाहीत. तरी देखील लोक या महिला सावकारांकडून व्याजी पैसे घेत आहेत. अनेक वेळेला या बाबत पोलीस ठाण्यात तक्रारी देखील झालेल्या आहेत. मात्र त्यातुन निष्पन्न काहीच होत नसल्याने आजच्या स्थितीला पैसे घेणार्‍यांची अवस्था खुपच बिकट झालेली आहे. जेवढे पैसे घेतले नाहीत त्यापेक्षा जास्त व्याजाच्या रक्कमा या अवैध्य सावकारीवाल्यांनी वसुल केले आहेत. या सावकारांची भुक एवढी मोठी आहे की पैसे घेणार्‍यांनी किती ही प्रयत्न केले की हयांचे पैसे परत दयावे तरी देणे शक्य नाही. कारण वर्षाकाठी दिलेल्या रक्कमापेक्षा दामदुप्पट व्याजाच्या रक्कमा होत आहेत. हे सावकार पैसे घेणार्‍यांच्या घरी जाउन त्यांच्या वस्तू, वाहने तर घेउन जात आहेत तसेच दम देउन कोरे धनादेश देखील ताब्यात घेत आहेत. आत्ताच्या स्थितीला या कोर्‍या धनादेशांच्या जोरावर मोठया प्रमाणात या सावकारांनी रक्कमा वसूल केल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या सावकारी धंदयात महिला अग्रेसर झाल्याने एकंदरीत बचत गटांच्या योजना योग्य की अयोग्य अशा चर्चांना उधान आले आहे.
तर दुसरीकडे बचत गटांना शासनाच्या योजनांचे वापर करून कर्जाऊ रक्कमा काढण्यासाठी देखील काही महिला एजंन्ट बचत गटांच्या अध्यक्षांकडून कर्ज मंजूर करण्यासाठी कर्ज मंजूर होण्याच्या रक्कमेवर पाच टक्क्यांपासून ते 25 टक्क्यांपर्यत पैशाची मागणी करत आहेत. हे देखील खुप चिंताजनक आहे. ग्रामीण भागात सर्रास महिला बचत गटांची फसवणूक होत आहे. हे ही तेवढेच सत्य आहे. तर काही महिला बचत गट शासनाच्या वेगवेगळया योजना स्वतःच्या फायदयासाठी अध्यक्ष वापरत आहेत आणि महिलांच्या नावाने अध्यक्षच पैसे लंपास देखील करत आहेत. एकंदरीत योग्य वेळी महिला बचत गटांच्या या अवैध्य बाबींकडे शासनाने लक्ष दिले नाही तर खरच गरजू महिला शासनाच्या योजनांपासून मुकल्याशिवाय राहणार नाहीत. जे पेण तालुक्यात सुरू आहे ते रायगड जिल्हयात इतर ही ठिकाणी सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.