पेणमध्ये एकवटले महाराष्ट्रातील गणेश मूर्तिकार :- धैर्यशील पाटील, खासदार

State

आजी माजी आमदार, खासदार देखील कारखानदारांच्या मदतीला धावले

पेण ( मुसकान खान)  ‌

हमरापूर विभाग गणेश मूर्तिकार उत्कर्ष मंडळाने राज्यातील सर्व गणेश मूर्तिकार, मूर्तिकार संघटना आणि गणेश मंडळांच्या पदाधिकारी आणि मूर्तिकारांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते. या जाहीर सभेला मुंबई मधील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो गणेश मूर्तिकार एकवटले होते. केन्द्र सरकारने गणेशमुर्ती साठी लागणाऱ्या पीओपी मातीवर जी बंदी घातली आहे त्याविरोधात आज झालेल्या जाहीर सभेत आपापली मते मांडण्यात आली.

यावेळी मूर्तीकरांना मार्गदर्शन करताना खासदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले की,  मूर्तिकार आणि मूर्तिकारांचा व्यवसाय जगला पाहिजे या उद्देशाने आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत, जेएसडब्ल्यु कंपनीच्या रोजगारापेक्षा गणपती कारखानदारांच्या माध्यमातुन अधिकचा रोजगार मिळत आहे, मात्र कंपनीचे प्रदूषण कोणी बघत नाही, मूर्तीच्या माध्यमातून प्रदूषणाकडे बघितले जाते ही चुकीची गोष्ट आहे,कारखानदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नशील राहणार.

यावेळी व्यासपीठावर आमदार अनिकेत तटकरे,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर, मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे, माजी अध्यक्ष कुणाल पाटील, हमरापूर विभाग मूर्तिकार संघटना अध्यक्ष जयेश पाटील, खजिनदार कैलास पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक मोकल, मुंबईचे मूर्तिकार सुरेश शर्मा, धुळ्याचे राजेंद्र चित्ते उपस्थित होते.
मागील वेळी विधिमंडळात मी हा प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी राज्य सरकारने तात्पुरत्या स्वरूपात ही बंदी उठवली होती, मात्र आता आपल्याला असा लढा द्यायचा आहे की ही पीओपी वरील बंदी कायमस्वरूपी उठवण्याचा निर्णय न्यायालयाला द्यावा लागेल. असे मत माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की आपला हा बंदी उठवण्याचा लढा मंत्री आदिती तटकरे, पंकजा मुंडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासमवेत एक समिती स्थापन करून योग्य अहवाल न्यायालयात सादर करण्यास राज्य सरकारला भाग पाडूया. विघ्नहर्ता आपल्यावर आलेले हे विघ्न नक्कीच दूर करेल, हा संकटमोचक बाप्पा आपल्यावरील संकट नक्कीच दूर करेल असे सांगून मूर्तिकारांच्या लढ्याला पाठिंबा दिला. तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी देखील आपला पाठिंबा देवून आपल्याला ज्या पुढारी, नेते मंडळी यांना भेटायचं असेल त्यासाठी मी सोबत आहे, शासन फक्त हिंदू धर्मियांवरच अन्याय का करत आहे, याविरोधात मी तुमच्या सोबत असून भले त्यासाठी मला राजकारणातून संन्यास घ्यावा लागला तरी चालेल असे सांगितले.

प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करून पीओपी मूर्तींवर बंदी आणायचा प्रयत्न झाला तर येथील लाखो व्यावसायिक बेघर होतील. त्यामुळे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कारखानदारांची बाजू मांडली आहे आणि त्यांनी या बाजूला दुजोरा दिला आहे आणि मला वाटत नाही की या मूर्तींमुळे प्रदूषण होत आहे. रविंद्र पाटील, आमदार – पेण

यावेळी मूर्तीकरांना मार्गदर्शन करताना माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी आपल्यावर जे पीओपी चे विघ्न आले आहे ते विघ्न हा विघ्नहर्ता नक्कीच दूर करेल असे सांगितले

पीओपी बंदीमुळे गणपती कारखानदार आणि त्यावर निगडित असणारे लाखो हात बेरोजगार होणार आहेत. शासनाने मूर्तिकारांना विश्वासात न घेता जी गाईडलाईन दिली आहे त्याचा आम्ही निषेध करत असुन वर्षातून दोन वेळा होणाऱ्या गणेशोत्सवातून प्रदूषण होत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर राज्यातील कंपन्यांमार्फत जो प्रदूषण होत आहे तो तुम्हाला दिसत नाही का असा सवाल उपस्थित करून आम्ही आमचा लढा न्याय मिळेपर्यंत लढत राहू. अभय म्हात्रे, अध्यक्ष – महाराष्ट्र गणेश मूर्तिकार संघटना