एप्रिलपासून इंधन खर्च थकीत; स्वयंपाकी व मदतनीस महिलांचा आंदोलनाचा इशारा
पेण, प्रतिनिधी : शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेतील स्वयंपाकी व मदतनीस महिलांचे मानधन आणि इंधन खर्च अनेक महिन्यांपासून थकीत असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. दिवाळीपूर्वी शासनाने थकीत देयके जमा न केल्यास पेण तालुक्यातील मध्यान्ह भोजन वाटप बंद करण्याचा इशारा स्वयंपाकी व मदतनीस महिलांनी दिला आहे.
यासंदर्भात स्वयंपाकी व मदतनीस महिलांच्या शिष्टमंडळाने नुकतेच पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांना निवेदन सादर केले.
महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यापासून मानधन मिळालेले नाही, तर एप्रिलपासून इंधन खर्चाची रक्कम जमा झालेली नाही. जूनपासून तेलाचा पुरवठा बंद असून ऑगस्ट महिन्यापासून धान्य व इतर आवश्यक साहित्याचाही पुरवठा झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांना भोजन देताना अडचणी निर्माण होत असून स्वयंपाकी व मदतनीस महिलांची आर्थिक कोंडी झाली आहे.
एकीकडे विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची जबाबदारी या महिलांवर असताना दुसरीकडे अनेक महिन्यांपासून मानधन आणि खर्चाची रक्कम मिळत नसल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या या महिलांनी आता शासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
दिवाळी हा आनंदाचा सण जवळ आला असतानाही हातात मानधन नसल्याने महिलांवर निराशेचे सावट आहे. त्यामुळे शासनाने दिवाळीपूर्वी थकीत मानधन, इंधन खर्च आणि आवश्यक साहित्याचा पुरवठा तातडीने करावा; अन्यथा संपूर्ण पेण तालुक्यात मध्यान्ह भोजन वाटप बंद करण्यात येईल, असा ठाम इशारा या महिलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिला.
आता शासन या महिलांच्या मागण्यांची दखल घेऊन दिवाळीपूर्वी थकीत देयके अदा करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
