पेणची सुरक्षितता वाऱ्यावर! पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ बंद

Raigad

पेण : प्रतिनिधी

पेण शहराच्या सुरक्षेसाठी तब्बल १ कोटी ४९ लाख ५७ हजार रुपये खर्च करून बसविण्यात आलेले १२० सीसीटीव्ही कॅमेरे सध्या पूर्णपणे बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षेचा महत्त्वाचा आधारच निकामी झाला असून, गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
तीन महिन्यांपूर्वी १२० पैकी ५५ कॅमेरे बंद असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, आता एकही कॅमेरा सुरू नसल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे, पेण पोलीस ठाण्यात आधीच कर्मचाऱ्यांची कमतरता असताना शहराच्या कानाकोपऱ्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवरच आली आहे.
१२० कॅमेरे बंद असताना कोट्यवधींच्या खर्चाचे फलित काय? हा प्रश्न उपस्थित होत असून, हे कॅमेरे बंद का आहेत, याबाबत पोलीस विभाग आणि नगरपालिका प्रशासनाकडून अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही. शहराच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा असलेला पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ बंद असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासन यावर तातडीने काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे