थर्टी फर्स्टच्या पार्टीवर खाकीची करडी नजर

Uncategorized

पेण:प्रतिनिधी
मुंबई, ठाणे, नवीमुंबई, कर्जत, माथेरान, महाबळेश्र्वर, अलिबाग या ठिकाणातील फार्म हाउस खिश्याला परवडत नसल्याने अनेक आंबट शौकीनांची पाउले पेण येथील फार्म हाउसकडे गेली दोन वर्षात वाढली आहेत. त्यातच नाताळ पासून 31 डिसेंबर पर्यंत या फार्म हाउसवर हाउस फुल गर्दी असते. या पार्श्र्वभूमीवर पेण तालुक्यातील पुर्व भागातील व पाबळ खोर्‍यातील फार्म हाउसवर अवैधरित्या दारू, गांजा, चरस, असे आंबट शौकीनांचे नशे वाढवणार्‍या पदार्थाची रेलचेल वाढत असल्याचा संशय खाकीला आल्याने खाकी सतर्क झाला आहे. त्यातच परवाना नसताना अनधिकृत ढाबे, चायनिज सेंटर, हॉटेल, यामध्ये देखील खुलेआम मद्यविक्री केली जाते. याकडे देखील उत्पादन शुल्क विभागाची बारीक नजर आहेच.
त्यातच कोणत्याही फार्म हाउस वर दारू विक्री अथवा पिण्यास सक्त मनाई असताना पुर्व विभागातील एक प्रसिध्द वॉटरपार्कमध्ये सर्रास दारूची विक्री होत असल्याची माहिती खाकीवाल्यांना मिळालेली आहे. त्यातच त्या वॉटर पार्कवर रात्रीच्या वेळी मुजर्‍याचे कार्यक्रम सुध्दा होत असल्याने कळत-नकळत चरस, गांजा सेवन करणारे आंबट शौकीन मोठया प्रमाणात पुर्व विभागात येतात. एकंदरीत रम-रमा-रमी ची रेलचेल पुर्वविभागाती फार्म हाउस मध्ये होणार यात काही शंकाच नाही. त्यामुळे खाकीवाल्यांनी या वेळेला या आंबट शौकीनांबरोबर आम्ली पदार्थ विक्री करणार्‍या टोळक्यांवर देखील बारीक नजर ठेवली आहे.
खाकीचा विशेष दस्त तयार झाला असून या दस्ताच्या माध्यमातून या फार्महाउस मालकांवर व बडया बापांच्या ढेडयांवर तसेच आंबट शौकीनांवर कायदेशीर कारवाई होणार यात काही शंका नाही. त्यामुळे जिल्हयातली खाकी आता अलर्ट मोडवर असल्याने थर्टी फर्स्ट च्या नावाने होत असणारा नंगा नाच थांबणार असेच काहीसे चित्र दिसत आहे. परंतु हा चित्र थांबणार की वाढणार हा येणारा काळच ठरवेल.