पेण तालुक्यात पुन्हा एकदा शीना बोरा सारखे हत्याकांड ?

Crime

दुरशेत गावाच्या हद्दीत सुटकेसमध्ये सापडला अज्ञात तरुणीचा मृतदेह

परिसरात एकच खळबळ; गूढ उकळण्याचे पेण पोलिसांसमोर मोठे आव्हान 

पेण :- मुस्कान खान

पुन्हा एकदा शीना बोरा सारखे हत्याकांड झाल्यासारखा गूढ प्रकार पेण तालुक्यातुन समोर आला आहे. पेण शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दुरशेत गावाच्या हद्दीत एक सुटकेस सापडली आहे. या सुटकेसमध्ये अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

मुंबई – गोवा महामार्गाचे चुनाभटटी ब्रिज पासुन पुढे थोड्या अंतरावर दुरशेत गावाकडे जात असताना कुजल्यासारखा वास येत होता.  स्थानिक ग्रामस्थांनी या ठिकाणी थांबून आजुबाजुला पाहणी केली असता रस्त्याच्या साईड पट्टीला लागून असलेल्या खड्ड्यात मोठ्या आकाराची सुटकेस आढळली. याच बॅगमधून दुर्गधीयुक्त वास येत असल्याची खात्री झाल्यानंतर खरोशी गावचे पोलीस पाटील करुणा पाटील व पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. 

पोलीस हवालदार टेमकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपुत व समद बेग यांनी जागेवर येवून पाहणी केली असता सुटकेस बॅगमध्ये एक अनोळखी तरुणीचे प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याचे दिसून आले. ता तरुणीचे वय ३० ते ४० असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अज्ञात आरोपीने अंदाजे चार ते पाच दिवसांपूर्वी या अनोळखी तरुणीची हत्या करुन तिला सुटकेसमध्ये भरुन या ठिकाणी आणून टाकले असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली असून या प्रकरणाचे गूढ उकळण्याचे मोठे आव्हान पेण पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.