पेण तालुक्यात पत्रकार दिन उत्साहात साजरा

State

। पेण । प्रतिनिधी
6 जानेवारी मराठी पत्रकार दिन पेण तालुक्यात मोठया उत्साहत साजरा करण्यात आला. सायंकाळी पेण गांधी वाचनालय येथे रोटरी क्लबच्या माध्यमातून पेण तालुक्यातील सर्व पत्रकारांना भेट वस्तू व प्रमाणपत्र देउन सत्कार करण्यात आले. तर सायंकाळी पेण येथील सर्व पत्रकारांसाठी स्नेहसंमेलन कार्यक्रम राजन लाड फार्म हाउस धावटे येथे संपन्न झाला.
तालुक्यातील सर्व पत्रकार एकत्र येउन पत्रकार दिन साजरा करण्याचे आणि स्नेह भोजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा पेण आयकॉन ऍड.मंगेश नेने, प्रसिध्द उदयोजक राजूशेठ पिचिका, प्रसिध्द उदयोजक तथा कामगार नेने राजन लाड पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदीप बागूल आणि सामाजिक कार्यकर्ते तथा उदयोजक दिनेशशेठ पाटील हे उपस्थित होते. प्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या फोटोला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्या नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक तथा नगरसेवक संतोष पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्त सुज्ञेश सुनिल फुणगे या सात वर्षाच्या विद्यार्थ्याने कळसूबाई शिखर सर केल्या बद्दल त्याचे पेण पत्रकारांकडून भेट वस्तू देउन सत्कार करण्यात आला. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार सुर्यकांत पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल, पत्रकार दिनेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर प्रमुख अतिथिंमध्ये उद्योजक राजू पिचिका यांनी सदैव पत्रकारांच्या बरोबर राहण्याचे अभिवचन दिले. तर कामगार नेते राजन लाड यांनी देखील पत्रकारांच्या सर्व अडीअडचणींसाठी केव्हा ही फोन करा मी तुमच्या बरोबर आहे असे सांगितले. तसेच पत्रकारांच्या कार्यक्रमासाठी लाड फार्म हाउस विनामुल्य उपलब्ध केव्हा ही करून दिले जाईल असे ही त्यांनी सांगितले. तर पेण आयकॉन मंगेश नेने यांनी दरवर्षी पत्रकारांनी एकत्र येउन अशाच प्रकारचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम करावा जेणे करून पत्रकारांची ऐकी काय आहे हे सर्वांना समजेल असे सांगून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा सर्व पत्रकारांना दिल्या. तर पोलीस निरिक्षक संदीप बागूल यांनी पत्रकार आणि पोलीस खाते हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. महानगरातील पत्रकारीता आणि पेण मधील पत्रकारीता यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. बे्रकींग न्यूजच्या जमान्यात देखील आज पेण येथील पत्रकार एखाद्या बातमीची पुर्ण खात्री जमा केल्याशिवाय बातमी लावत नाहीत. आज पत्रकार हे समाजाचा आरसा आहे. ते आमच्या चुका असल्या तरी दाखवतात आणि आम्ही एखादे काम उत्तम केल्यास तेवढयाच तत्परतेने आमची वाहवाह करतात. पत्रकारांनी समाजात कसा समतोल राखायचा याचा उत्तम काम पेणचे पत्रकार करत आहे. भविष्यात पोलीस आणि पत्रकार हातात हात घालून काम करू असे शेवटी त्यांनी सांगितले. तद नंतर सर्व पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तू देण्यात आल्या आणि सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला.