नव्या पिढीला घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची- आमदार संजय केळकर

Uncategorized

पेण ः- प्रतिनिधी
संगणकाच्या युगात मुलांना बाहेरील ज्ञान जरी मिळत असले तरी या काळातही नव्या पिढीला संस्कार देण्याचे व त्यांना घडविण्याचे काम शिक्षक करीत आहेत. यामुळे शिक्षकांची जबाबदारी अजून वाढली असल्याचे दिसत असून ते काम आपले आदर्श शिक्षक करत आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ( प्राथमिक विभाग) चे संस्थापक तथा आमदार संजय केळकर यांनी पेण येथील आदर्श शाळा आणि आदर्श शिक्षक पुरस्काराच्या समारंभा वेळी सांगीतले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ( प्राथमिक विभाग) शाखा रायगडच्या वतीने पेणमधील रविराज फार्म हाऊस येथे आदर्श शिक्षक, आदर्श शाळा पुरस्कार व दिनदर्शिका प्रकाशन सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहोळ्याचे उद्घाटन शिक्षक परिषदेचे संस्थापक आमदार संजय केळकर यांच्या हस्ते व जि.प.माजी अध्यक्षा ऍड.नीलिमाताई पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमास माजी जि.प. विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, राज्य नेते संजय निजापकर, ज्येष्ठ नेते नरेंद्र गुरव, मा. नगरसेवक शोमेर पेणकर, सौ. कमळाताई केळकर, शिक्षक परिषदेचे कोकण उपाध्यक्ष सुजित बनगर, कार्याध्यक्ष संदीप शिंदे, जितेंद्र बोडके, जिल्हाध्यक्ष उदय गायकवाड, विजय गायकवाड आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार संजय केळकर यांनी सांगितले कि, आमदारकीच्या निवडणुकीत शिक्षक परिषदेचे पदाधिकार्यांनी हिरीरीने भाग घेतला. हे एक आत्मियतेचे नाते आहे. शिक्षकांचे वेतन श्रेणी, मेडिकल क्लेम, जिल्हा परिषद मधील प्रश्न, धोरणात्मक प्रश्न व मुख्यत्वे मुख्यालयाचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आमची आहे. शिक्षक परिषदेचे प्रश्न विधानसभेत मांडण्याचे भाग्य मला लाभले. संघटना गेली अनेक वर्ष हा उपक्रम राबिवत असून त्यामध्ये सातत्य ठेवण्याचे काम केले आहे म्हणून आमदार संजय केळकर यांनी पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी माजी जि. प. अध्यक्षा ऍड.नीलिमा पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, अतिशय दुर्गम भागात जाऊन शिक्षकवर्ग ज्ञान देण्याचे काम करत असतात अशा शिक्षकांचा गौरव करण्याचा काम शिक्षक परिषद करीत असून एक कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम होत आहे. स्वर्गीय मोहन पाटील यांनी दिलेल्या शिकवणीनुसार ज्या खुर्चीत आपण बसतो तेथे जनसामान्यांना न्याय देण्याचे काम करावयाचे आहे या शिकवणीनुसार जिल्हापरिषदमध्ये काम करीत असताना गेली अनेक वर्ष शिक्षकाच्या समस्या सोडिवण्याचे काम केले. अर्बन बँकेच्या प्रश्ननी जनसामान्यांना न्याय देण्यासाठी पेण ते मुख्यमंत्री निवासस्थानी काढलेल्या पदयात्रेत खा.धैर्यशील पाटील यांच्या बरोबर आमदार संजय केळकर यांनीही सहभाग घेतला होता. पण जनसामान्यच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी हि असली पाहिजे हे या नेत्यांनी दाखवून दिले. जिल्हा परिषद शाळांसाठी लागणारे सीएसआर फंड त्या त्या भागातील कारखान्याकडून मिळवून देण्याचे काम नेतेमंडळी नक्की करतील असे आश्वासन यावेळी ऍड.नीलिमा पाटील यांनी दिले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आले.