श्रमदानातून आदिवासी बांधवांनी बांधला बंधारा

State

पेण ः मुस्कान खान
पाबळ खोर्‍यातील दुर्गम भागात बोरीचामाळ हा साधारणः 500 लोकवस्ती असलेला आदिवासी समाजाचा गाव आहे. या गावामध्ये पूर्वी रोजगार हमीतून काकळकोंड ओढयाला बंधारे बांधून पाणी अडविण्याचे काम केले जात असत. मात्र गेली 4 ते 5 वर्ष रोजगार हमीतून शासन निधी उपलब्ध करून देत नसल्याने या गावातील तरुणांनी एकत्र येउन सामुहिक निर्णय घेतला की, गावाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येउन शासनाच्या निधीची वाट न पाहता सामुहिक श्रमदानातून दरवर्षी एक मोठा बंधारा बांधायचा. यावर्षी बोरीचामाळ या गावातून 75 ते 80 तरुण-तरुणांनी एकत्र येउन 50 ते 60 फुट अंतराचा बंधारा बांधून पाणी अडविले आहे. आमच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष जाउन या गावातील तरुणांशी चर्चा केली. तेव्हा साकव संस्थेमध्ये काम करणारे उमेश दोरे यांनी सांगितले की, पूर्ण बंधारा हा श्रमदानातून बांधला आहे. आम्ही शासनाचा एक ही रुपाया घेतलेला नाही. हा बंधारा बांधल्याने गेल्या आठवडयाभरातच गावातील तीन विहिरींची पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच या बंधार्‍याच्या बाजूला जी विहिर आहे त्या विहिरीला पाणी बंधारा बांधल्यावर बाराही महिने असतो आणि त्या विहिरीतून चार गावांना जलजीवन मिशन अंतर्गत योजना राबवून पाणी पुरविला जात आहे. गेली 6 वर्ष आम्ही श्रमदानातून बंधारा बांधत आहोत त्यामुळे आम्हाला या बंधार्‍याचा फायदा भाजी व मळे लावण्यासाठी होतो. व यातूनच आमचा उदरनिर्वाह होतो यावेळी उमेश दोरे यांनी शासनाला व सामाजिक संस्थांना आवाहन केले आहे की, आम्हाला पक्का बंधारा बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुन दयावी. जेणेकरुन तो कायमस्वरुपी आमच्या गावाच्या विकासासाठी उपयोगी पडेल.
यावेळी उपसरंच शोभा दारे, मा.उपसरपंच पाडुरंग दोरे,गामपंचायत सदस्य धाकी दोरे, साकव संस्था कार्यकर्ते उमेश दोरे, कुमा दोरे, नामदेव वारगुडे, नामदेव शिंगवा, अनंत दोरे, यशवंत वारगुडे, हरेश पाचंगा, गजानन शिंगवा, राघो शिंगवा अदी तरुण उपस्थित होते.