| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबागमध्ये घडलेल्या दरोडा प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे. या दरोड्यात आमदारांचाही हस्तक्षेप असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आमदार महेंद्र दळवी अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात दिड कोटी रुपयांच्या दरोडा प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये आमदरांचे सुरक्षा रक्षक तसेच घरकाम करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. हे प्रकरण इथेच थांबत नाही, तर या प्रकरणाची व्याप्ती खुप मोठी असून निवडणूकीपुर्वी 3 ते 4 महिन्यापासून या प्रकरणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणामुळे पोलीस विभागातील अंतर्गत वाददेखील चव्हाट्यावर आला असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. पोलीस निरीक्षक साळे तसेच हवालदार सुर्यवंशी यांचा प्रकरणाशी काहीही संबंध नसताना या प्रकरणात त्यांना अडकविण्याचा प्रयत्न केल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. हे प्रकरण गुंतागुंतीचं असून खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा करीत असताना प्रामाणिक कर्मचाऱ्यांना अडकवू नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार, याकडे केवळ अलिबागकरांचेच नाही तर संपूर्ण रायगडकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
निवडणूकीपुर्वी आ. दळवींच्या घरी काम करणाऱ्या समाधान पिंजारीने या घटनेला सुरुवात केली. पिंजारीचे नातेवाईक नितीन रामचंद्र पिंजारी, नामदेव हुलगे व नवनाथ पिंजारी हे सोने खरेदी व विक्रीचा व्यवसाय करीत असून नागपूर येथे त्यांचे दुकान आहे.
आठ महिन्यापूर्वी या तिघांनी समाधान पिंजारीला त्यांच्याकडे 3 किलो सोने असून स्वस्त दरात म्हणजेचे 2 कोटी रुपयांना देण्याचे सांगितले. नातेवाईक असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेऊन समाधानने ही बाब आ. दळवी यांना सांगितली.
समाधानच्या वडिलांसोबत घनिष्ठ संबंध असल्यामुळे तसेच समाधान घरी कामाला असल्यामुळे विश्वास ठेऊन आ. दळवींनी 2 कोटी रुपये समाधानला हातउसने दिल्याचे समाधानने सांगितले. इथून खऱ्या प्रकरणाला सुरुवात झाली. कमी किंमतीत सोनं मिळणार या आशेने दोन कोटी रुपये मिळाल्याने त्याने अन्य तिघांना सांगितले. दहा दिवसांनी समाधानचा चुलत भाऊ नितिन पिंजारी, नामदेव व नवनाथ हे इन्होवा कारने अलिबागला आले. समाधानने 2 कोटी रुपये त्यांना दिले, मात्र त्यांनी सोने मागुन येत असल्याचे कारण सांगत समाधानला नाशिकपर्यंत नेले.
नाशिकला एका ठिकाणी त्याला थांबवून अन्य तिघे सोने घेऊन येतो असे सांगून गेले. 4-5 तास येत नाही म्हणून समाधानने संपर्क साधून त्यांना विचारणा केली असता रक्कम पोलिसांनी जप्त केली असून त्याला अलिबागला जाण्यास सांगितले. समाधान खुप घाबरला होता. हा सारा प्रकार त्याने आ. दळवींना फोनद्वारे सांगितला. त्यांच्या सांगण्यानूसार समाधान अलिबागला परतला.
मदत म्हणून आ. दळवींनी अनेकदा त्या तिघांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क झाला नाही. निवडणूकीनंतर हिवाळी अधिवेशनासाठी समाधान आमदारांसोबत नागपूरला गेला. त्याने नितिन पिंजारी, नामदेव व नवनाथ यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी नविन ज्वेलर्सचे दुकान, स्कॉर्पिओ गाडी तसेच बंगला बांधल्याचे समाधानला समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हे सारं समाधानने आमदारांना सांगितले.
यानंतर पैसे वसूल करण्यााठी नवा गेम आखला गेला. समाधानने एका इसमाकडे 5 किलो सोने आहे व तो स्वस्त दरात देत असल्याचे त्या तिघांना सांगितले. त्यानूसार तिघांनी 4 फेब्रुवारीला दोन कोटी रुपये घेऊन येतो, असे समाधानला सांगितले. ही बाब समाधानने आमदारांना सांगितली. आमदारांनी सुरक्षेसाठी असलेले पोलीस समाधानसोबत पाठविले.
दुपारी 3.30 वाजता नितिन, नामदेव व नवनाथ ब्रिजा कारने तिनविरा धरणाजवळ आले. आमदारांच्या सांगण्यानूसार समाधान दोन सुरक्षा रक्षकांसमवेत इन्होवा कारने तिनविराजवळ गेला. सोबतचे सुरक्षा रक्षक पाहून त्या तिघांनी गाडी तिथेच सोडून पळ काढला.
वाहनाची झडती घेतल्यानंतर समाधानला गाडीत दिड कोटी रुपये सापडले. रोख रक्कम घेऊन समाधान आमदारांच्या निवासस्थानी राजमाळा येथे गेला. हे सारं समाधान गणपत पिंजारी यांनी पोलिसांना 6 फेब्रुवारी रोजी दिलेल्या जबाबात म्हटले आहे. यानंतर मात्र प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे.
8 तारखेच्या फिर्यादीनूसार प्रकरण काय?
नामदेव हुलगे यांच्या फिर्यादीनूसार, आरोपी समाधान पिंजारी याने नागपूर येथील सोन्याचे व्यापारी नामदेव हुलगे यांच्याशी काही दिवसांपूर्वी संपर्क साधला. शंकर कुळे याच्याकडे सात किलो सोने पाच कोटी रुपयांमध्ये देतो, असे हुलगे यांना आमिष दाखविले. स्वस्त दरात सोने मिळत असल्याने ते खरेदी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. एक कोटी 50 लाख रुपये घेऊन हुलगे, दीप गायकवाड व इतर मंडळी एका कारमधून अलिबागकडे निघाले.
तिनविरा धरणाजवळ आल्यावर गायकवाडने कार थांबविली. पोलीस आले आहेत, असे सांगून फिर्यादी नामदेव हुलगे व त्यांचा सहकारी यांना गाडीतून खाली उतरण्यास सांगितले. त्यानुसार ते गाडीतून उतरले. त्याचवेळी दीप गायकवाडने कार सुरू करून पनवेलच्या दिशेने पळ काढला. समाधाननेही राजकीय नेत्याचा आधार घेत पळ काढला. ही घटना 4 फेबु्रवारीला घडली. त्यानंतर फिर्यादी त्यांच्या कारने पनवेलला गेले.
फिर्यादींनी शिवसेना कार्यकर्ते पृथ्वीराज शिंगरे यांना सारा प्रकार सांगितला. 6 फेब्रुवारीला शिंगरे यांनी फिर्यादींना घेऊन अलिबाग पोलीस ठाणे गाठले.
प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी समाधानने दिलेल्या जबाबानूसार फिर्यादींना तुम्हीच समाधानकडून 2 कोटी रुपये यापुर्वी घेतले असून अनेक राज्यात तस्करी केली असल्याचे म्हटले. ही बाब शिंगरे यांना न पटल्यामुळे 7 फेब्रुवारीला सर्वांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेतली. त्यानंतर घार्गे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
समीर म्हात्रे, विकी साबळे, समाधान पिंजारी, दीप गायकवाड यांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले. त्यांच्याकडून दीड कोटी रुपये जप्त करण्यात आले.
अंतर्गत वादात सुर्यवंशींचा बळी?
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पुर्वीचा राग मनात धरुन हनुमान सुर्यवंशी यांना नाहक या प्रकरणात गोवले असल्याचा आरोप सुर्यवंशी यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. मुख्य सुत्रधाराला न शोधता चुकीच्या पद्धतीने चित्र रंगवून सुर्यवंशी यांना अडकविल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास खाडे यांच्याकडून काढून सीआयडीकडे द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रकरणात आमदार साहेबांंचं नाव?
समाधान पिंजारे याने दिलेल्या जबाबानूसार आणि पोलिसांनी केलेल्या नोंदीनूसार यामध्ये आ. दळवी यांचा हस्तक्षेप असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून आमदार अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.