पेण ः- प्रतिनिधी
सन 2019 रोजी जम्मू काश्मीर श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याला आज सात वर्षे पूर्ण झाली असून त्या घटनेचे स्मरण ठेवून हल्ला झाल्यापासून दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेण आणि महात्मा गांधी वाचनालय यांच्या माध्यमातून शहीदांना श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पेणमधील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देउन पेणमधील माजी सैनिक सुरेंद्र ठाकुर, राजेंद्र हटकर, वसंत पोईलकर, लहु पाटील, पेणचे पोलिस निरीक्षक संदीप बागुल, सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष दिपश्री पोटफोडे, ऍड मंगशे नेने, योगेश पाटील विविध सामाजिक कार्यकर्ते, वकील, पोलिस अधिकारी व कर्मचारी, सहयाद्री प्रतिष्ठानचे मावळे, राजकिय पक्षांचे पदाधिकारी, शालेय विदयार्थी, पत्रकार जेष्ठ नागरिक, महिला वर्ग सुजाण नागरिक व देशभक्त उपस्थित होते.
यावेळी बोलताना पेण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांनी सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातुन अशा प्रकारचे पुण्यस्मरण केले जाते याचे मला तर अभिमान वाटतेच पण हे बघून कोणताही खाकी वर्दीला अभिमानच वाटेल असे सांगून पोलिस दलाच्या वतीने श्रध्दांजली वाहिली. तर सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांनी आजचा दिवस हा व्हॅलेंटाइन डे म्हणजेच प्रेमाचे प्रतिक म्हणून असला तरी सर्वप्रथम देशप्रेम व्यक्त करावा म्हणून आम्ही दरवर्षी हा जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम करत असतो. व्हॅलेंटाइन डे साजरा करा पण सर्वोच्च प्रेम हे आपल्या देशाप्रती सीमेवर काम करणार्या जवानांसाठी व्यक्त करा असे सांगितले. यावेळी कॉंग्रेसच्या नंदा म्हात्रे, ऍड मंगेश नेने, माजी. सैनिक सुरेंद्र ठाकुर यांनी देखील आपली मतं व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली.
