वारकरी संप्रदायातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व हरपलेः

अध्यात्मिक

ह.भ.प. श्री नामदेव महाराज म्हात्रे यांचे दुःखद निधन

पेण : प्रतिनिधी

पेण तालुक्यातील वडखळ गावचे सुप्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार तथा श्रीमंत संगीत भागवत कथाकार ह.भ.प. श्री नामदेव महाराज म्हात्रे यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे. आपल्या आयुष्यभर हरिनामाचा प्रचार, समाजप्रबोधन आणि धार्मिक कार्यासाठी झटणारे हे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने वडखळसह संपूर्ण रायगड जिल्हा हळहळ व्यक्त करत आहे.
नामदेव महाराज यांनी केवळ कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून अध्यात्माची पताका फडकवली नाही, तर सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले. श्री हनुमान प्रासादिक वारकरी भजन मंडळ वडखळचे संचालक म्हणून त्यांनी अनेकांना भक्तिमार्गाची प्रेरणा दिली. सूर्योदय हुतूतू संघाचे निर्माते व कर्णधार म्हणून त्यांनी युवकांना एकत्र बांधण्याचे कार्य केले.
ग्रामपंचायत वडखळ येथे तब्बल ३३ वर्षे सदस्य आणि ५ वर्षे उपसरपंच म्हणून लोकसेवा बजावताना त्यांनी गावाच्या विकासासाठी अविरत प्रयत्न केले. जयकिसान विद्यालय उभारणीसाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केले, तसेच श्री मारुती मंदिर उभारणीतही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले.
अखिल भारतीय वारकरी मंडळ पेण तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळ रायगड जिल्हाध्यक्ष, तसेच अखिल भारतीय वारकरी सांप्रदाय महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना रायगड भूषण (२०११-२०१२) व तेज रायगड (२०१२-२०१३) पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
माऊली ज्ञानेश्वर महाराज मंदिर निर्मितीसाठी जागा मिळवण्यापासून ते पूर्ण बांधकाम होईपर्यंत त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांचे जीवन म्हणजे भक्ती, समाजसेवा आणि साधेपणाचा सुंदर संगम होता.
नामदेव महाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायातील एक दीपस्तंभ हरपला असून, त्यांच्या आठवणी आणि कार्यरूप वारसा भाविकांच्या मनात कायम जिवंत राहील.
हरिनामाचा गजर करत समाजप्रबोधन करणारा हा संतस्वभावी माणूस आज अनंताच्या प्रवासाला निघून गेलाः!