पेण:-प्रतिनिधी
पेण शहराच्या बसस्थानकात एकेकाळी प्रवाशांच्या ओठांवर जशी पेणच्या पेढ्यांची गोडी रेंगाळत असे, तशीच खोबऱ्याच्या चिक्कीची अवीट चव देणारे तुकाराम म्हात्रे उर्फ ‘चिक्कीवाले काका’ आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या निधनाने पेणच्या सामाजिक आणि व्यापारी क्षेत्रातील एक जिव्हाळ्याचा, प्रेमळ आणि सर्वपरिचित चेहरा हरपला आहे.
अनेक दशकांपासून पेण बसस्थानक परिसरात खोबऱ्याची चिक्की विकून त्यांनी हजारो प्रवाशांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या चिक्कीची चव ही केवळ खाद्यपदार्थाची नव्हती, तर त्यामागे असलेले आपुलकीचे हास्य, प्रेमळ संवाद आणि माणुसकीची ऊब यामुळे ‘चिक्कीवाले काका’ हे नाव घराघरात पोहोचले होते. आजही अनेक प्रवाशांच्या स्मरणात त्यांच्या चिक्कीची गोडी आणि त्यांचा साधाभोळा स्वभाव तितकाच ताजा आहे.
तुकाराम म्हात्रे हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निस्सीम चाहते होते. शिवसेनेच्या जडणघडणीच्या आणि संघर्षाच्या काळात पेण तालुक्यात पक्षाची मुळे रुजविण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. पक्षनिष्ठा, कार्यकर्त्यांप्रती आत्मीयता आणि समाजाशी असलेली बांधिलकी यामुळे ते अनेकांच्या आदराचे स्थान बनले होते.
अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाल्याची बातमी समजताच पेण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर विश्वेश्वर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘चिक्कीवाले काका’ म्हणून ओळख मिळवणाऱ्या तुकाराम म्हात्रे यांच्या जाण्याने पेणच्या आठवणींच्या पानावरचा एक गोड अध्याय संपला असला, तरी त्यांच्या हस्ते मिळालेल्या चिक्कीची गोड चव आणि त्यांनी जपलेले माणुसकीचे नाते कायमच सर्वांच्या स्मरणात राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
