पेण : प्रतिनिधी
मुस्लिम समाजाचा अत्यंत पवित्र सण म्हणून ओळखली जाणारी बकरी ईद (ईद-उल-अजहा) पेण शहरात धार्मिक वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. बकरी ईद हा सण त्याग, श्रद्धा, समर्पण आणि मानवतेचा संदेश देणारा मानला जातो. हजरत इब्राहिम यांनी अल्लाहप्रती असलेली निष्व आणि त्यागाची भावना दाखवून दिल्याच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. समाजात बंधुभाव, प्रेम आणि गरजूंप्रती मदतीची भावना निर्माण करण्याचे मोठे महत्त्व या सणाला आहे.
पेण येथील वरच्या मोहल्ल्यात सकाळी आठ वाजता ईदची नमाज अदा करण्यात आली, तर खालच्या खाटीक मोहल्ल्यात सकाळी साडेआठ वाजता नमाज पठण करण्यात आले. नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. परिसरात आनंद, उत्साह आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले होते.
सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पेण पोलीस ठाण्याकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे स्वतः उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
यावेळी नगरसेवक प्रवीण पाटील, माजी नगरसेवक संतोष मंदा लक्ष्मण पाटील हे देखील उपस्थित होते. सर्वांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देत समाजात सौहार्द आणि एकोप्याचा संदेश दिला.
