तरणखोपच्या शिष्टमंडळाची प्रांत कार्यालयात बैठक, महामार्गावरील समस्या सोडविण्याचे अधिकार्‍यांचे आश्र्वासन

Raigad

पेणःप्रतिनिधी
तरणखोप गावालगत असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सर्व्हिस रोड, सांडपाण्याची व्यवस्था, एसटी बस थांबा तसेच गतिरोधक आदी विविध समस्या निर्माण झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्या तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी तरणखोप ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालयाकडे उपोषणाचे निवेदन दिले होते.
मात्र, प्रांत अधिकारी प्रविण पवार यांच्या विनंतीला मान देत ग्रामस्थांनी उपोषणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आज प्रांत कार्यालयात संबंधित अधिकारी आणि तरणखोप ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी धीरज शहा, प्रांत अधिकारी प्रविण पवार, पोलीस निरीक्षक संदीप भोसले तसेच तरणखोप ग्रामस्थांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
बैठकीदरम्यान तरणखोप गावालगत महामार्गावर युद्धपातळीवर रम्बलिंग स्ट्रिप्स बसविण्यात येतील, तसेच ग्रामस्थांच्या मागणीनुसार एसटी बस थांबा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्र्वासन देण्यात आले. त्याचबरोबर सर्व्हिस रोड आणि गटार व्यवस्थेचे कामही येत्या काही महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असा शब्द राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता धीरज शहा यांनी दिला. या आश्र्वासनामुळे तरणखोप ग्रामस्थांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.
यावेळी तरणखोप ग्रामस्थांमध्ये दिनेशशेठ पाटील, उद्योजक शैलेश पाटील, किरण पाटील, नारायण पाटील, सचिन पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.