कौशल्य शिक्षणातील उल्लेखनीय कार्याची दखल; एस. एस. भगत यांना ‘कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार’ प्रदान

शैक्षणिक

कौशल्य शिक्षणाच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण कार्य करत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विकासात मोलाची भर घालणारे आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागोठणे येथील गटनिदेशक तथा प्रभारी प्राचार्य श्री. एस. एस. भगत यांच्या कार्याचा नुकताच गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शिव-छत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार सोहळा २०२६ अंतर्गत त्यांना ‘कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२६’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराचे वितरण संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपच्या नेत्या गीता पालरेजा यांचीही विशेष उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांच्या हाताला कौशल्याची ताकद आणि भविष्यासाठी आत्मविश्वास देणाऱ्या भगत यांच्या कार्याची या पुरस्काराच्या माध्यमातून यथोचित दखल घेण्यात आली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार प्रशिक्षण मिळावे, संस्थेमध्ये उत्तम मूलभूत सुविधा व पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात, तसेच निदेशकांना त्यांच्या शैक्षणिक व प्रशिक्षण कार्यात आवश्यक ते सहकार्य मिळावे, यासाठी भगत यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

प्रशासनातील शिस्त, शैक्षणिक कार्यातील सातत्य आणि कौशल्य प्रशिक्षणाच्या विकासाची दूरदृष्टी, या त्रिसूत्रीच्या बळावर त्यांनी संस्थेच्या प्रगतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कार्याचा झालेला गौरव हा केवळ व्यक्तीचा सन्मान नसून कौशल्य शिक्षणाच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणेचा क्षण मानला जात आहे.

भगत सरांच्या कार्याला मिळालेला हा सन्मान त्यांच्या कार्यातील प्रामाणिकपणावर आणि समर्पणावर उमटलेली कौतुकाची मोहोर असून, आजचा हा गौरव त्यांच्या पुढील प्रशासकीय व शैक्षणिक वाटचालीला नवी ऊर्जा, नवा उत्साह आणि नव्या संकल्पांची प्रेरणा देणारा ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या उल्लेखनीय यशाबद्दल श्री. एस. एस. भगत यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व प्रशासकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.