पेणःप्रतिनिधी
पेण एज्युकेशन सोसायटीच्या बाल गंधर्व 2024-25 च्या उद्घाटन प्रसंगी सुप्रसिध्द अभिनेते उदय नेने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आज या महोत्सवाच्या उद्घाटनाचा पाहुणा म्हणून मला बोलवले असले तरी मी पाहुणा म्हणून आलेलो नाही. पेण असेल, पेण एज्युकेशन सोसायटी असेल ही शाळा असेल बापुसाहेब किंवा मंगेश दादा असतील माझे त्यांच्याशी घरचे नाते आहे आणि इथे येताना मी पेणच्या घरी येतोय असे नेहमी वाटते. त्यामुळे मी इथे तुमच्यातलाच एक म्हणून आलेलो आहे पाहुणा म्हणून अजिबात आलेलो नाही. या महोत्सवाला मला पाहुणा म्हणून बोलवले याचा मला आनंद होतोय. मला बोलवले म्हणून आनंद होत नाही आहे तर आनंद यासाठी होतोय की पेणचे लखलखणारे भविष्य, सळसळणारी पोर, पेणचे उदयाचे सुपरस्टार माझ्या समोर बसलेले आहेत त्यांच्या समोर मला बोलायला दिले याचा मला खरच आनंद आहे. या महोत्सवाचे नाव बाल गंधर्व महोत्सव आहे. बाल गंधर्व नाव महाराष्ट्राला अतिशय चांगले परिचित आहे. बाल गंधर्व म्हटल्यावर आपल्याला आठवते ती अभिजात कला, भव्यदिव्यता, शास्वत. आज मी इथे आल्यानंतर हा सभामंडप पाहिला, हया व्यासपिठावरची तयारी पाहिली ज्या जल्लोषात ढोल पथकाने आमचे स्वागत केले त्यानंतर स्वागतपर गीत नृत्य झाले ते सगळे मी पाहिले आणि मला असे वाटते की बाल गंधर्व हे नाव या महोत्सवाला सार्थ आहे. भव्यदिव्यता, ही शिस्त ती उर्जा आज या कार्यक्रमात जाणवली त्याचा ही मला खुप आनंद झाला. मी तुम्हाला सुपरस्टार म्हटले उगाच नाही म्हटले तर ते सत्य आहे. तुम्हाला सुपरस्टार म्हटले त्याचे कारण असे आहे की, आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही असा चांगला गुण असतो. की एखादा चांगला गातो, एखादा चांगला बोलतो, एखादा चांगला अभिनय करतोय, एखादा चांगला मित्र किंवा मैत्रिण असते, एखादा चांगला लिडर असतो, एखादा चांगला खेळाडू असतो, आपल्यातला चांगलं जर आपल्याला ओळखता आलं तर उद्याचा सुपरस्टार होण्यापासून आपल्याला कुणी थांबवू शकत नाही. त्यामुळे इथे बसलेला प्रत्यक विद्यार्थी व विद्यार्थीनी माझ्या नजरेत सुपरस्टार आहेत.
पुढे त्यांनी सांगितले की यशाची पहिली पायरी असते प्रयत्न करणे आणि यशाला कोणताही शॉटकट नाही. मेहनत हिच यशाची गुरूकिल्ली आहे. हमखास यशाला कोणतीही युक्ती नाही. यश मिळवणे सोपे नाही त्याचा मार्ग खडतर आहे. त्याचा एकच मंत्र आहे सतत प्रयत्न करत राहणे. यशस्वी झालात तर आनंद व्यक्त करा अयशस्वी झालात तर यशाच्या दृष्टीने एक पाउल पुढे गेलात असे समजा. त्यामुळे स्पर्धांमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे सुदृढ शरीर. रोज नित्यनियमाने एक तास तरी व्यायाम करा. हा सल्ला लक्षात ठेवा. सुदृढ शरीर तर सुदृढ विचार आणि सुदृढ विचार तर यश नक्की. शेवटी त्यांनी मोबाईल पासून दूर राहण्याचा सल्ला देखील विद्यार्थ्यांना दिला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अंजली जोशी यांनी केले. तर बाल गंधर्व ची संकल्पना प्रा. अथर्व घाटे यांनी सांगितली. तर अध्यक्षीय भाषण पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍड.मंगेश नेने यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.उदय मानकावळे आणि विद्यार्थी श्रृती साने, शुभांग देव यांनी केले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ समाजसेवक तथा पेण एज्युकेशन सोसायटीचे मा.अध्यक्ष बापुसाहेब नेने, मा.कार्याध्यक्ष बापुसाहेब आठवले, उपाध्यक्ष संजय कडू, संचालक समिर साने, श्रीराम दातार, संचालीका ऍड.डॉ.निता कदम, ज्योती राजे अदी मान्यवर उपस्थित होते.
