पेण : प्रतिनिधी
वन हक्क कायद्यांतर्गत प्राप्त झालेल्या पाबळ खोऱ्यातील दावेदार आदिवसींना तहसीलदार पेण यांनी खास आदेश काढून कृषी खाते ग्रामसेवक व तलाठी यांना आदेश दिल्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्याऱ्यांनी पंचनामे केले आहेत. मात्र पंचनामे होउनही या आदिवासींना अजूनही नुकसान भरपाई मिळाली नसल्याने आदिवासींमध्ये तीव्र नाराजी आहे.
या संदर्भात दिनांक १२ नोव्हेंबर रोजी बराडावाडी येथे साकव संस्थेच्या वतीने तानाजी दोरे यांच्या अध्यक्षतेखाली वन हक्क दावेदार आदिवासींचा भव्य मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला मोहाडी, झापडी, गवळावाडी, देवमाल, पेडका, तुरमाळ, बाहेरमाल, चाफेकर, चितळकोंड, धारवाडी, बोरीचा माळ, पाहिरमाळ चिंचवाडी, गंगावणे आदिवासी वाडीतील वन हक्क दावेदार मोठ्या संख्येने हजर होते.
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना साकव संस्थेचे सचिव अरुण शिवकर यांनी सांगितले की, तहसीलदार पेण यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या वन हक्क दावेदार आदिवासींचे शेती नुकसानीचे पंचनामे करणे तसेच शासकीय योजना बैंक कर्जाचा लाभ देणे बाबत आदिवासी विकास गटविकास अधिकारी भुमी अभिलेखा कृषी खाते व अग्रणी बँक यांना खास दिलेल्या शासकीय आदेशाच्या पत्राचे वाचन केले व त्यांच्यात जागृती केली. एवढेच नव्हे तर वन हक्क कायद्यांतर्गत प्राप्त झालेल्या वरील वाडयातील ३७१ आदिवासी कुटुंबांना फोल्डरमध्ये टाकून या आदेशाच्या प्रत्येकी दोन प्रती वाटप करण्यात आल्या.
यावेळी आदिवासींनी या मेळाव्यात आपले मनोगत मांडताना सांगितले की, एकूण १७१ दावे प्रांत कार्यालयात प्रलंबित आहेत तसेच अनेक दावेदारांच्या दोन ते तीन ठिकाणी जमिनी असूनही वन खात्याने हे दावे करताना या जमिनी त्यावेळी मोजल्या नसल्याने अनेक आदिवासींना जमिनीचे प्रमाण कमी मिळालेले आहे.हे सांगताना अरुण शिवकर यांनी पुढे सांगितले की, यापुढील कार्यक्रम म्हणून दावेदारांपैकी काही दावेदार मयत असून त्यांच्या वारसांची वारस नोंद करणे बाबत अर्ज भरण्याची मोहीम सुरु केली असून लवकरच याच धरतीवर दळी जमीन धारकांचा मेळावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या मेळाव्याला संस्थेच्या कार्यकर्त्यां मंजुळा पाटील व उमेश दोरे यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याला संस्थेचे अध्यक्ष पांडुरं तुरे, उपाध्यक्ष डॉ. सुरुद्र धुमाळ, भूषण वाघमारे, नयना कदम, नामदेव रामबम, ठुम्ना, राजीव बंगारा, पिठ्या दोरे इत्यादी आदिवासी कार्यकर्ते हजर होते.
