पेण ः प्रतिनिधी
अर्बन बँक संघर्ष समितीचे पदाधिकारी नरेंद्र जाधव यांनी पत्रकार परिषद घेउन शिशिर धारकर यांच्या वर जोरदार हल्ला चढवत शिशिर धारकर हे मतदारांची दिशाभूल करत आहेत असा थेट आरोप केला आहे.
पेण नगरपालिकेच्या निवडणूकीच्या प्रचाराचा ज्वर तापलेला असतानाच अर्बन बँक प्रकरणावरून मुद्दे आणि गुद्दे सुरू आहेत. 2010 ला अर्बन बँकेवर आर्थिक निर्बंध आले आणि 75 वर्षाची सुवर्ण कारकीर्द क्षणार्धात मातीमोल झाली. त्यानंतर पेण नगरपालिकेच्या तीन निवडणुका झाल्या तीनही निवडणूकीला अर्बन बँकेचा मुद्दा मोठया प्रमाणात गाजला. गेल्या दोन दिवसापासून अर्बन बँक प्रकरणातील मुख्य आरोपी तथा तत्कालीन अर्बन बँकेचे अध्यक्ष शिशिर धारकर यांनी प्रसार माध्यमांसमोर अर्बन बँकेचा मुद्दा मांडला आणि पुन्हा एकदा अर्बन बँकेचा मुद्दा कळीचा ठरला. अर्बन बँक संघर्ष बचाव समितीचे पदाधिकारी नरेंद्र जाधव यांनी 2010 पासून अर्बन बँक प्रकरण अभ्यासपुर्ण हाताळला आणि न्यायालयीन लढा दिला. परंतु न्यायालयीन लढा देत असताना राजकारणाच्या बदलत्या दिशेचा ङ्गायदा अर्बन बँक प्रकरणातील आरोपींना कळत नकळत होत गेला. जवळपास 15 वर्ष उलटून गेली तरी, अर्बन बँक प्रकरणाचा निश्र्चित असा तोडगा निघाला नाही. मात्र मार्च 2024 ला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 98 ब अन्वये वसुली प्रमाण पत्र आदेश 5 मार्च 2024 ला निघाला. त्यानुसार यातील दोषींवर वैयक्तिक व सामुदायिक रक्कम वसुली करण्या संदर्भात निर्णय देण्यात आला. त्यानुसार शिशिर धारकर यांच्यासह इतर 24 जणांवर साधारणतः 23 कोटी 90 लाख 30 हजार एवढया रक्कमेची भरपाई प्रत्येक जणाने करण्याचा आदेश पारित करण्यात आले. मात्र जवळपास दिड वर्ष उलटून गेले तरी, त्या आदेशाची पुर्तता झाली नाही. या संदर्भात आज अर्बन बँक बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी नरेंद्र जाधव यांनी पेण मध्ये पत्रकार परिषद घेउन प्रसार माध्यमांसमोर अर्बन बँकेचे प्रकरण काय आहे आणि शिशिर धारकर जनतेची दिशाभुल कशी करीत आहेत याबाबत माहिती दिली.
