गणेश विसर्जन घाटाच्या कामाची नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्याकडून पाहणी

Raigad
पेण : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेण शहरातील भोगावती नदीवरील गणपती विसर्जन घाटाच्या सुरू असलेल्या कामाला नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी आज भेट देऊन पाहणी केली. गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांना सुरक्षित व सुविधायुक्त व्यवस्था उपलब्ध व्हावी, तसेच गणपती आगमनापूर्वी घाटाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनाकडून कामाला गती देण्यात येत आहे.
भोगावती नदीकाठावरील रुद्र पाटली परिसरात विसर्जन घाटाचे काम सुरू असून, गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी नगराध्यक्षांनी घाटाला भेट दिली. यावेळी सुरू असलेल्या कामाची माहिती घेत आवश्यक त्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.
या पाहणीवेळी सभापती कालावती पाटील, सभापती आफ्रिन अखवारे, मुख्याधिकारी जीवन पाटील, दयानंद गावंड तसेच नगरसेवक अभिराज कडू, सिध्देश बाटे, हितेश पाटील, पार्थ शहा उपस्थित होते. गणेशोत्सव काळात शहरातील हजारो गणेशभक्त विसर्जनासाठी या घाटाचा वापर करतात. त्यामुळे घाटाचे काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे.
गणरायाच्या विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नगरपालिकेची यंत्रणा सज्ज होत असल्याचे या पाहणीमुळे स्पष्ट झाले आहे