तरणखोप मार्गावरील भोगावती नदीवरील पूल महाराष्ट्रातील ‘उत्कृष्ट पूल’!

Raigad
१०० मीटर लांबीच्या उच्चस्तरीय पुलाची राज्य शासनाच्या पुरस्कारासाठी निवड; रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजू पिचिका यांच्या गुणवत्तापूर्ण कामाचे राज्यभर कौतुक
पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या पेण-तरणखोप मार्गावरील इजीमा क्र. ५६ भोगावती नदीवरील १०० मीटर लांबीच्या उच्चस्तरीय पुलाची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘उत्कृष्ट पूल’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पेणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, या पुलाच्या माध्यमातून पेणच्या विकासकामाला राज्यस्तरावर गौरवाची पावती मिळाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ११ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार सन २०२५-२६ या वर्षासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय व वैशिष्ट्यपूर्ण बांधकामांना ‘उत्कृष्ट रस्ता’, ‘उत्कृष्ट पूल’ आणि ‘उत्कृष्ट इमारत’ या तीन विभागांत पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये पेण तालुक्यातील तरणखोप येथील भोगावती नदीवरील या उच्चस्तरीय पुलाचा समावेश करण्यात आला आहे.
या पुलामुळे पेण-तरणखोप मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत झाली असून, नदीपलीकडील नागरिकांच्या दळणवळणालाही मोठी चालना मिळाली आहे. तांत्रिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण, दर्जेदार आणि सार्वजनिक उपयोगाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या या पुलाची राज्य शासनाच्या पुरस्कारासाठी निवड होणे ही पेण तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
रामेश्वर कन्स्ट्रक्शनच्या गुणवत्तेवर राज्य शासनाची मोहोर
या पुलाच्या बांधकामाची जबाबदारी रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा राजू पिचिका यांच्या देखरेखीखाली पार पडली. दर्जेदार बांधकाम, तांत्रिक अचूकता, नियोजन आणि कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य देत रामेश्वर कन्स्ट्रक्शनने हे काम पूर्ण केले. त्यामुळे या पुलाला मिळालेला राज्यस्तरीय सन्मान हा केवळ पेण तालुक्याचाच नव्हे, तर रामेश्वर कन्स्ट्रक्शनच्या गुणवत्तापूर्ण बांधकाम कार्याचा गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात सातत्याने दर्जेदार काम करण्यासाठी ओळख निर्माण करणाऱ्या राजू पिचिका यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या या पुलाची राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पूल’ पुरस्कारासाठी निवड झाल्याने रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राज्यभरातून कौतुक होत आहे. पेणच्या विकासाला हातभार लावणाऱ्या या उल्लेखनीय कामामुळे स्थानिक बांधकाम व्यवसायाच्या गुणवत्तेलाही राज्यस्तरावर अधोरेखित होण्याची संधी मिळाली आहे.
पेण तालुक्यातील एका महत्त्वपूर्ण विकासकामाची राज्य शासनाच्या पुरस्काराच्या यादीत निवड झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, तरणखोपचा भोगावती पूल हा पेणच्या विकासाची आणि दर्जेदार बांधकामाची नवी ओळख ठरला आहे.