पेण : प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १५ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये पेण तालुक्यातील राजिप शाळा मायणी-कोयना येथील शिक्षक रामकृष्ण कृष्णा भोईर यांचा समावेश असून, त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाट्यगृहात गुरुवार, दि. १० सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी रामकृष्ण भोईर यांना शाल, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र आणि आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्यास रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले, विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, शिक्षण अधिकारी सुनील नायकडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य, अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
मायणी-कोयना शाळेतील शिक्षक रामकृष्ण भोईर यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे पेण तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात तसेच मायणी-कोयना शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
