दसऱ्यानिमित्त बाजारपेठेत झेंडूच्या फुलांसह भाताच्या लोंब्यांना मागणी

Raigad

विद्यार्थ्यांकडून सरस्वती पूजन; शेतकरी, व्यावसायिकांकडून साहित्याचे पूजन करून विजयादशमीचा उत्साहात साजरा

पेण : प्रतिनिधी
हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असलेला आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जाणारा विजयादशमी अर्थात दसरा सण पेण परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. दसऱ्यानिमित्त बाजारपेठेत सकाळपासूनच खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ पाहायला मिळाली. झेंडूच्या फुलांसह भाताच्या लोंब्या आणि आंब्याच्या पानांसोबत तयार केलेल्या तोरणांना बाजारात मागणी दिसून आली.
दसरा हा विजय, समृद्धी आणि नव्या कार्याचा शुभारंभ करण्याचा सण मानला जातो. या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचे हार आणि आंब्याच्या पानांची तोरणे लावण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर भाताच्या लोंब्यांना विशेष महत्त्व असल्याने बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात भाताच्या लोंब्या उपलब्ध झाल्या होत्या. त्यामुळे बाजारपेठेला सणाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
दसऱ्याच्या दिवशी सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये सरस्वती पूजन करून विद्येची देवता असलेल्या देवी सरस्वतीचे आशीर्वाद घेतले. दुसरीकडे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या साहित्याचे, तर व्यावसायिकांनी दुकानांमधील साहित्याचे पूजन करून दसरा साजरा केला. अनेकांनी आपल्या वाहनांचे तसेच कामकाजासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांचे पूजन केले.
परंपरा, श्रद्धा आणि संस्कृती यांचा सुंदर संगम असलेल्या दसरा सणानिमित्त नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी शुभ मानल्या जाणाऱ्या या दिवसामुळे बाजारपेठेतही चैतन्य निर्माण झाले होते.