धोकादायक इमारतीतील सील केलेले गाळे पुन्हा सुरू; दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
पेण : प्रतिनिधी
पेणमधील अंतोरा रोडवरील एसटी स्टँडच्या मागील बाजूस असलेल्या अति धोकादायक आशीर्वाद इमारतीतील गाळेधारकांना सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी बाहेर काढून गाळे सील करण्यात आले होते. मात्र, आता हेच गाळे पुन्हा सुरू झाले असून तेथे भाजीविक्रीची दुकाने थाटण्यात आल्याचे दिसत आहे.
इमारतीतील सर्व रहिवाशांना सुरक्षिततेच्या कारणास्तव खाली करण्यात आले असताना, त्याच इमारतीतील गाळ्यांमध्ये भाजीविक्री कशी सुरू आहे? नगरपालिकेची कारवाई केवळ कागदोपत्रीच आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
अति धोकादायक इमारतीत पुन्हा व्यवसाय सुरू होत असताना नगरपालिका प्रशासन नेमके काय करत आहे? या विक्रेत्यांना कोणाचे अभय आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. केवळ कारवाईचा देखावा न करता नगरपालिका प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
