जावळीतील वृक्षारोपण प्रकरण पेटले!

Raigad

रोपांचा पंचनामा करून दोषींवर कारवाई करा; पत्रकार मितेश जाधव यांची मागणी

पेण : रायगड जिल्ह्यातील जावळी ग्रामपंचायत हद्दीत वृक्षारोपणासाठी आणलेल्या रोपांची हेळसांड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रोपे महिनाभर रस्त्याच्या कडेला पडून राहिल्यानंतर काही रोपे गवताच्या झुडपांत टाकण्यात आल्याचे छायाचित्र समोर आले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पत्रकार मितेश जाधव यांनी पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि सामाजिक वनीकरण विभागाला निवेदन दिले आहे. संबंधित रोपांचा प्रत्यक्ष पंचनामा करून सखोल चौकशी करावी आणि दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जावळी ग्रामपंचायतीला एकूण किती रोपे मिळाली, किती रोपांची लागवड झाली, किती रोपे खराब झाली आणि किती रोपे गवताच्या झुडपांत टाकण्यात आली, याची अधिकृत माहिती देण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच रोपांच्या वितरणापासून ते लागवड आणि संगोपनापर्यंतच्या प्रक्रियेची तपासणी करून छायाचित्रांसह लेखी अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
एकीकडे शासनाकडून वृक्षारोपणासाठी प्रोत्साहन दिले जात असताना, दुसरीकडे रोपांची अशी अवस्था होत असेल, तर पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
आता गटविकास अधिकारी आणि सामाजिक वनीकरण विभाग या प्रकरणाची कितपत दखल घेतात, चौकशीतून काय निष्पन्न होते आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.