प्रात्त कार्यालयात अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांसोबत आमदारांची बैठक संपन्न
पेणः प्रतिनिधी
पेण तालुक्यातील हमरापूर विभागातील वाहतूक कोंडी व पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रांत कार्यालयात आमदार रविशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी व ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली. यावेळी अतिक्रमण हटवण्यास ग्रामस्थांनी एकमुखाने पाठिंबा दर्शविला.
हमरापूर विभागात गणपती कारखानदारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने गणेशोत्सवापूर्वी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले असून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग बंद झाल्याने रस्त्यांवर पाणी साचते. अतिक्रमण हटवताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याची ग्वाही प्रशासनाने दिली.
रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूंना प्रत्येकी १० फूट जागा सोडण्याचे मान्य करण्यात आले. शनिवारपासून संबंधित विभागांचे अधिकारी व गणपती कारखानदार संयुक्त सर्वेक्षण करणार असून, २७ तारखेपासून जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू होणार आहे. हमरापूर फाटा ते दादर खाडीपर्यंत सुमारे ९ कोटी रुपये खर्चाचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे.
या बैठकीस आमदार रविशेठ पाटील, प्रांत अधिकारी प्रविण पवार, डी.वाय.एस.पी. जालींदर नालकूल, तहसीलदार तानाजी शेजाळ, सभापती स्मिता पाटील, पंचायत समिती सदस्य अस्मिता पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.एस. पाटोले, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गजें आदी अधिकारी उपस्थित होते. तसेच हमरापूर, जोहे, कळवे, दादर व सोनखान येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि तलाठी उपस्थित होते
