पेणमधील दोन सरकारी कार्यालयांत कर्मचारी गायब!

Raigad

सकाळी १०:३० वाजताही खुर्च्या रिकाम्या; हालचाल रजिस्टर नसल्याचा धक्कादायक प्रकार

पेण : प्रतिनिधी
सरकारने पाच दिवसांचा आठवडा लागू करूनही पेणमधील सार्वजनिक बांधकाम उपविभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयांत कर्मचाऱ्यांच्या वेळेवर उपस्थितीचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. प्रतिनिधींनी सकाळी १०:३० वाजता पाहणी केली असता, सार्वजनिक बांधकाम कार्यालयात सागर घाटकर आणि सुरेश सोनावणे हे दोघेच उपस्थित होते. सागर मेणे, समीर म्हात्रे आणि प्राजक्ता मुक्क हे गैरहजर होते. विशेष म्हणजे, कार्यालयात हालचाल रजिस्टर ठेवले जात नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयात रजिस्टरवर १४ कर्मचाऱ्यांची नोंद असताना महेश पाटील आणि अमोल भेकरे हे दोघेच उपस्थित होते. पेण शाखेत अनिरुद्ध पाटील हे एकमेव कर्मचारी उपस्थित होते.
याबाबत उपअभियंता एस. एस. पाटोले यांच्याकडून समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नसल्याचे प्रतिनिधींनी सांगितले. कार्यकारी अभियंता शैलेंद्र गुंड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. उपकार्यकारी अभियंता व्ही. एस. शिगवण यांनी माहिती देण्याचे आश्वासन दिले; मात्र अर्धा तास प्रतीक्षा करूनही फोन आला नाही. पुन्हा संपर्क साधल्यावर गैरहजर कर्मचाऱ्यांची अर्ध्या दिवसाची रजा कापणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांत कर्मचारी गैरहजर आणि उपस्थितीच्या नोंदींबाबतही प्रश्नचिन्ह! वरिष्ठ अधिकारी या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार का? सरकारी कार्यालयांतील या अनागोंदीला आळा घालण्याची मागणी होत आहे.