महसूल खात्याचा आणि जलसंपदा खात्याचे भोगावती नदीकडे दुर्लक्ष
पेणः प्रतिनिधी
पेणकरांची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या भोगावती नदीच्या पात्रामध्ये गेल्या दोन-तीन वर्षात अनधिकृतरित्या भराव टाकून मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. या बांधकामाकडे ना महसूल खात्याचे लक्ष, ना जलसंपदा खात्याचे लक्ष, ना नगरपालिका प्रशासनाचे. त्यामुळे भोगावतीचे पात्र दिवसेंदिवस अरुंद होत चाललेले आहे. याचा फटका नदीच्या आजु बाजुच्या गृहवस्तीला बसत आहे. गेल्या दोन-तीन वर्षात थोडा जरी पाऊस पडला तरी, भुंडया पुलाच्या वरून पाणी जातो. यावर्षी तर नव्याने बांधलेल्या भुंड्यापुलावरून देखील पाणी गेला. याचाच अर्थ नदीपात्र अरूंद झालेला आहे. यामुळे भोगावती नदी संवर्धन प्रेमी संतप्त झाले आहेत.
भोगावती नदीच्या भुंड्या पुलापासून ते हेटवणे धरणाच्या पायथ्यापर्यंत भोगावती नदीच्या पायथ्याचा विचार केल्यास नदी पात्रात अनधिकृतरित्या बांधकाम करणाऱ्यांची संख्या शतक पार होईल. परंतु या बाबींकडे प्रशासन का दुर्लक्ष करत आहे समजत नाही. भुंड्या पुलाच्या शेजारी तरणखोप स्मशानभुमीपर्यंत भले मोठे भोगावती नदीचे पात्र होते. परंतु आज या भोगावती नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात भर टाकून पात्राची रुंदी कमी करण्यात आलेली आहे. हे काम रात्रीच्या वेळी केल्याचे मत स्थानिकांचे आहे. मात्र दिवसा केलेले भराव दिसत आहे. असे असताना ही बाब महसूल खात्याच्या तलाठयांना अथवा मंडळ अधिकाऱ्यांना कशी दिसत नाही हीच मोठी संशोधनाची बाब आहे. तरणखोप स्मशानभूमी पासून एक नजरेचा कटाक्ष टाकल्यास सहज लक्षात येत आहे की, नदी पात्रात अनधिकृतरित्या भराव करून नदीपात्र अरुंद करण्याचे काम इमानेइतबाराने केलेले आहे. तसेच या नदी पात्रात नव्याने बांधकाम झालेले आपल्याला पहायला मिळत आहे. काही दिवसापूर्वीचा विचार करता काही भागात नव्याने भराव करण्यात आलेला आहे.
एक वेळ अशी होती की, मुंड्या पुलाकडून धावटयाकडे जाण्याचा जो मार्ग होता त्या रस्त्यापर्यंत नदीचे पात्र होते. परंतु आज कित्येक ठिकाणी भराव करून नदीपात्रच अरुंद केले गेले आहे. असाच नदीपात्र अरुंद झाल्यास भविष्यात पुराचे पाणी नदीपात्र सोडून इतरस्त आपला मार्ग निवडेल आणि मोठया प्रमाणात याचा धोका जनजीवन विस्कळीत होण्यास होईल. तसेच, हेच अनधिकृत बांधकाम करणारे नुकसान झाला म्हणुन प्रशासनाला दोषी धरतील. तरी वेळेस प्रशासनाने या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलावा अन्यथा भविष्यात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यास विचार करण्यापलिकडे काहीच हातात राहणार नाही. वेळेस खबरदारी म्हणून पंचनामे करून संबंधीतांवर कारवाई व्हावी अशी मागणी भोगावती संवर्धन प्रेमी करत आहेत. परंतु महसुल खात्याचे आणि जलसंपदा कर्मचारी याकडे कानाडोळा करत आहेत. महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांचा आणि या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या मंडळीचा आर्थिक हितसंबंध असल्याचे देखील दबक्या आवाजात बोलले जात आहे. परंतु स्वतःहुन कोणी पुढे येत नाही आहे. या बार्बीकडे प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांनी आपल्या वातानकुल खोल्या सोडून बाहेर काय घडतोय याकडे ही लक्ष द्यावे. गेल्या जानेवारी महिन्यापर्यंत ज्या भागामध्ये भराव नव्हता त्या भागात आज भराव झालेले पहायला मिळत आहे. हा भराव नक्कीच एका रात्रीत झालेले नाही. मग भरावाला मदत करणारे कोण याचा शोध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. आणि याचा शोध घेऊन जर या महाभागांवर कारवाई झाली नाही तर भोगावती संवर्धन प्रेमी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. या बाबींचा विचार देखील महसूल खात्याने आणि जलसंपदा खात्याने करणे गरजेचे आहे.
चौकट
तलाठयांना पहाणी करण्यासाठी पाठवितो :- नायब तहसिलदार, प्रसाद कालेकर
पेण तहसिलदार तानाजी शेजाळ यांना भ्रमन्तीध्वनी वरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. परंतु नायब तहसिलदार प्रसाद कालेकर यांना भ्रमन्ती ध्वनीवरून संपर्क झाला तेव्हा त्यांनी तातडीने तलाठयांना पाहणी करण्यासाठी पाठवतो असे सांगितले.
