पेण : प्रतिनिधी
संतांच्या विचारांची परंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची खरी ओळख आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी घातलेला वारकरी संप्रदायाचा पाया आणि संत तुकाराम महाराजांनी चढवलेला अध्यात्मिक विचारांचा कळस आजही समाजाला सदाचार, समता आणि संस्कारांची दिशा देत आहे. वारकरी संप्रदायामुळे समाजाची उन्नती होत असून, तरुण पिढीलाही आपल्या संस्कृतीची ओळख होत आहे, असे प्रतिपादन पेणचे आमदार रवीशेठ पाटील यांनी केले.
रायगड जिल्हा परिषद तसेच पेण-सुधागड पंचायत समितीच्या माध्यमातून संत गाडगेबाबा महाराज यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागातील भजनी मंडळांना भजन साहित्याचे वाटप पेण येथे करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार रवीशेठ पाटील बोलत होते.
यावेळी आमदार रवीशेठ पाटील म्हणाले की, “आजच्या आधुनिक आणि संगणकाच्या युगातही भजनाची गोडी कायम आहे, ही आपल्या संस्कृतीची ताकद आहे. भजन आणि डीजे यांची तुलना केली तर भजनातून मिळणारी आध्यात्मिक अनुभूती आणि संस्कार याला कशाचीच सर येऊ शकत नाही. त्यामुळे भजन, कीर्तन आणि वारकरी परंपरेला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. शासनानेही ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी डीजेवर निर्बंध आणले असून, भजन परंपरेला प्रोत्साहन देणारा जिल्हा परिषदेचा हा उपक्रम निश्चितच अभिनंदनीय आहे.”
वारकरी संप्रदाय हा केवळ भक्तीचा मार्ग नसून समाजप्रबोधनाची चळवळ आहे, असे सांगताना त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांसारख्या संतांनी समाजाला दिलेल्या समतेच्या आणि माणुसकीच्या विचारांचा गौरव केला.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, सभापती वैकुंठ पाटील तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष नीलिमा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. भजनाच्या माध्यमातून संस्कार, अध्यात्म आणि महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेची ओळख नव्या पिढीला होत आहे. विशेषतः तरुण वर्ग कळत-नकळत या सांप्रदायिक परंपरेशी जोडला जात असून, ही बाब समाधानकारक असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
या उपक्रमांतर्गत पेण तालुक्यातील ९५ तर सुधागड तालुक्यातील १९ भजनी मंडळांना भजन साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये टाळ आणि मृदुंगासह आवश्यक भजन साहित्याचा समावेश होता. ग्रामीण भागातील भजनी मंडळांना प्रोत्साहन देत जिल्हा परिषदेने संस्कृती संवर्धनाचा नवा पायंडा घातल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास पेण पंचायत समितीच्या सभापती स्मिता पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भस्मा, पंचायत समिती सदस्य तसेच विविध भजनी मंडळांचे पदाधिकारी, वारकरी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतांच्या अभंगातून भक्ती, भजनातून संस्कार आणि वारकरी परंपरेतून माणुसकीचा संदेश देणारा हा उपक्रम पेण-सुधागडच्या ग्रामीण भागात भक्तीमय वातावरण निर्माण करणारा ठरला.
