पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील अंतोरा धरणाला तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवसंजीवनी मिळाली आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक वर्षे धरणाचे बांधकाम रखडल्याने पेण शहरासह तरणखोप, अंतोरा, नवघर, सापोली, बेडे व वरेडी परिसरातील शेतकऱ्यांना फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या शेतीसाठी पाण्याची समस्या भेडसावत होती.
यंदा कमी पाऊस झाल्याने निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन खासदार धैर्यशील पाटील यांनी पुढाकार घेत पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर खासदार धैर्यशील पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या उपअभियंता गीतांजली मंडलिक, सहाय्यक अभियंता रत्नदीप वासनिक आणि कनिष्ठ अभियंता संजय जाधव यांच्यासह धरणाची संयुक्त पाहणी केली. यावेळी धरणाचे बांधकाम करण्याचे निश्चित करण्यात आले.
धरणात पाणी साचल्यामुळे परिसरातील शेतीला मोठा दिलासा मिळणार असून भूजल पातळीत वाढ होण्यासही मदत होणार आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत धरणाचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही उपअभियंता गीतांजली मंडलिक यांनी खासदार धैर्यशील पाटील व ग्रामस्थांना दिली.
यावेळी अंतोरा सरपंच अमित पाटील, माजी सरपंच रोहिदास पाटील, माजी सरपंच राजा पाटील यांच्यासह अंतोरा, नवघर, बेडे व सापोली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहणीनंतर खासदार धैर्यशील पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
