पेणमध्ये पहिल्यांदाच रंगणार ‘गारवा’च्या सुरांची मैफल!

Raigad

गायक मिलिंद इंगळे आणि कवी सौमित्र यांची उपस्थिती; दिवाळीनिमित्त संगीतप्रेमींना सुरेल पर्वणी

पेण : प्रतिनिधी
दिवाळीच्या उत्सवी वातावरणात सुरेल गीतांची मेजवानी आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारी एक अविस्मरणीय संध्याकाळ पेणकरांना अनुभवता येणार आहे. ‘गारवा हवाहवासा… संध्या सुरांची!’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडा कॉलनी येथील गुरुकुल शाळेच्या मैदानावर करण्यात आले आहे. या कार्यक्रमात लोकप्रिय गायक मिलिंद इंगळे आणि प्रसिद्ध कवी सौमित्र यांची उपस्थिती हे प्रमुख आकर्षण असणार आहे.
पेण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २ मधील युवा उद्योजक राजन जनार्दन पाटील आणि नगरसेविका पल्लवी प्रसाद कालेकर यांच्या वतीने दिवाळीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरेल गीतांची मैफल, मधुर आठवणी आणि संगीताचा आनंद यांचा संगम या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे.
‘गारवा’, ‘गारवा हा असा’, ‘मन उधाण वाऱ्याचे’ यांसारख्या लोकप्रिय गीतांमुळे रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे गायक मिलिंद इंगळे यांच्या सुरांनी ही संध्याकाळ रंगणार आहे. तर आपल्या संवेदनशील आणि भावस्पर्शी कवितांसाठी ओळखले जाणारे कवी सौमित्र यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला साहित्यिक आणि सांगीतिक रंगत लाभणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. समिरा गुजर-जोशी करणार आहेत.
दिवाळीच्या धामधुमीनंतर पेणकरांना संगीताच्या माध्यमातून विरंगुळ्याचे आणि आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, हा या आयोजनामागील उद्देश आहे. कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह उपस्थित राहून या सुरेल मैफलीचा आनंद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.