0%
Sunday, October 04, 2026

पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीकडून १०% लाभांश मंजूर

Raigad
१०२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रोह्यात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
रोहा : पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लि., पेण संस्थेची १०२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ. सी. डी. देशमुख शहर सभागृह, रोहा येथे उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेत संचालक मंडळाने शिफारस केलेल्या १० टक्के लाभांशास सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली.
सभेचे दीपप्रज्वलन रोहा पंचायत समितीच्या सभापती सौ. विजयाताई पाशिलकर, उपसभापती श्री. संजय मांडलुस्कर, संस्थेचे चेअरमन श्री. विज्ञान भास्कर पाटील व व्हा. चेअरमन श्री. विष्णू राघो सफरा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ईशस्तवन व स्वागतगीताने सभेची सुरुवात झाली.
प्रथमतः सन २०२५-२६ या कालावधीत निधन झालेल्या संस्थेच्या सभासदांसह थोर व्यक्ती व इतर दिवंगत व्यक्तींना दुखवटा वाचन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर जिल्हा परिषद शिक्षण-क्रीडा स्वीकृत समितीचे श्री. विनोद जोशी सर, श्री. संतोष यादव सर, श्री. मारुती कळंबे सर, रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, रायगड जिल्हा संघटनेचे अध्यक्ष, रोहा तालुका संघटनेचे अध्यक्ष, राज्याध्यक्ष तसेच संस्थेच्या संचालकांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर विषयपत्रिकेतील विषयांनुसार सभेचे कामकाज सुरू करण्यात आले. सभेत श्री. सुभाष भोपी, श्री. राजेंद्र मोकल, श्री. प्रकाश काथारा, श्री. विजय पवार, श्री. सचिन खोपडे, श्री. मनोज मढवी, श्री. निर्भय म्हात्रे, श्री. बबन पाटील, श्री. अजय कापसे व श्री. प्रमोद पाटील यांनी विविध प्रश्न व सूचना मांडल्या.
सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना संस्थेचे चेअरमन श्री. विज्ञान पाटील, श्री. सोपन चांदे सर, मानद सचिव श्री. मोहन भोईर सर व श्री. विनोद जोशी सर यांनी समर्पक उत्तरे दिली.
या सभेतील प्रमुख निर्णयांपैकी संचालक मंडळाने शिफारस केलेल्या १० टक्के लाभांशास सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली. त्यामुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
या वार्षिक सभेस संस्थेचे एकूण २००३ सभासद उपस्थित होते. सभेचे संपूर्ण कामकाज अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
शेवटी सभेस उपस्थित सर्व सभासद, संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाने दिलेल्या सहकार्याबद्दल संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. विष्णू राघो सफरा यांनी आभार मानले. राष्ट्रगौरव गीताने सभेची सांगता करण्यात आली.