पेण : प्रतिनिधी
शासकीय कार्यालयांमध्ये वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात आता शासनाने कठोर भूमिका घेतली आहे. कार्यालयीन वेळेचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही काही कर्मचारी वेळेवर कार्यालयात हजर राहत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
शासनाने पाच दिवसांचा आठवडा लागू केल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३०, तर अ ते क गटातील कर्मचाऱ्यांसाठी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी कार्यालयीन वेळ निश्चित करण्यात आली आहे.
यासंदर्भात ३१ डिसेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार कार्यालयीन वेळेचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. महिन्यातून तीन वेळा उशिरा कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची एक दिवसाची किरकोळ रजा कपात करण्याची कारवाई केली जाऊ शकते.
मात्र, नियम असूनही काही कर्मचाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता शासनाने कार्यालयीन उपस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून, वेळेचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. सरकारी कार्यालयांतील कामकाजात शिस्त आणि वेळेचे भान राखण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
