उर्वरित ९० टक्के ठेवींची रक्कम मिळवून देण्यासाठी धैर्यशील पाटील यांची ग्वाही; मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचीही तयारी
पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या हक्काची संपूर्ण रक्कम मिळवून देण्यासाठी सर्वपातळीवर संघर्ष सुरूच ठेवणार असल्याची ठाम ग्वाही माजी खासदार धैर्यशील पाटील यांनी दिली. ठेवीदारांना सध्या १० टक्क्यांपर्यंतची रक्कम मिळणार असून उर्वरित ९० टक्के रक्कम मिळवण्यासाठी बँकेच्या ताब्यात असलेल्या जमिनींची विक्री करून ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर परत मिळावेत, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आवश्यक असल्यास याप्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वेगाने कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या प्रश्नासंदर्भात खोपोली येथे शुक्रवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत धैर्यशील पाटील यांनी ठेवीदारांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी संघर्ष समितीचे नेते नरेंद्र जाधव यांनी ठेवीदारांना पैसे मिळवण्यासाठी आवश्यक असलेले फॉर्म कशा पद्धतीने भरावेत आणि ते बँकेमध्ये कशा प्रकारे जमा करावेत, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या सभेला आमदार संजय केळकर, संघर्ष समितीचे नेते नरेंद्र जाधव, भाजप किसान आघाडीचे सुनील गोगटे, दत्तात्रेय मसुरकर, क्लबचे संस्थापक बाबुभाई ओसवाल आणि अध्यक्ष सावित्री जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार संजय केळकर यांनीही ठेवीदारांच्या प्रश्नावर भूमिका मांडली. ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक मार्गांनी सातत्याने प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र, केवळ काही प्रमाणात रक्कम मिळणे पुरेसे नसून ठेवीदारांना त्यांची संपूर्ण रक्कम परत मिळेपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेत सुनील गोगटे आणि दत्तात्रेय मसुरकर यांनीही आपले विचार मांडले. राजेंद्र ओसवाल यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.
