दोन महिने उलटले, आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती नाहीत!

Crime

मयूर वनगे मारहाण प्रकरणात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; पोलीस निरीक्षकांना थेट जाब

पेण : प्रतिनिधी
पेणमधील मयूर वनगे मारहाण प्रकरणाला १ ऑक्टोबर रोजी तब्बल दोन महिने पूर्ण झाले, मात्र या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे तपासाच्या गतीवर आणि आरोपींच्या अटकेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणातील आरोपी म्हणून भाजपचे उपाध्यक्ष मंगेश दळवी, रुपेश दळवी आणि हरेश दळवी यांची नावे समोर आली आहेत. मात्र, दोन महिने उलटूनही हे तिघे पोलिसांना सापडलेले नसल्याने “आरोपी नेमके कुठे आहेत आणि त्यांना अटक का होत नाही?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे यांनी पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्याशी थेट चर्चा केली. मयूर वनगे प्रकरणातील तपासाची दिशा, आतापर्यंत झालेली पोलीस कारवाई आणि आरोपींविरोधात करण्यात आलेल्या कायदेशीर कार्यवाहीची त्यांनी माहिती घेतली.
मारहाणीच्या घटनेला दोन महिने उलटूनही आरोपी अटकेपासून दूर असल्याने आता तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत कोणती पावले उचलली? आरोपींचा ठावठिकाणा पोलिसांना का मिळत नाही? आणि दोन महिन्यांनंतरही अटकेबाबत ठोस कारवाई का झालेली नाही? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, आरोपींना फरार घोषित करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे का? हा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे. मात्र, आरोपींना ‘फरार’ घोषित करण्याबाबतची नेमकी कायदेशीर स्थिती आणि पोलिसांनी केलेली कारवाई याबाबत अधिकृत माहिती समोर येणे आवश्यक आहे.
राजकीय हस्तक्षेपानंतर तपासाला वेग येणार?
आमदार शशिकांत शिंदे यांनी थेट पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाची माहिती घेतल्याने प्रकरणाला आता नवे राजकीय वळण मिळाले आहे.
यामुळे आता पोलिसांच्या तपासाला वेग येणार का? मंगेश दळवी, रुपेश दळवी आणि हरेश दळवी यांना अटक होणार का? दोन महिन्यांपासून पोलिसांच्या हाती न लागलेल्या आरोपींच्या शोधासाठी कोणती ठोस पावले उचलली जाणार? आणि या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई नेमकी काय असणार?
याकडे आता पेणकरांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आरोपींविरोधातील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी असून, त्यांची बाजूही तपासाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची राहणार आहे.