पेणमध्ये दीड महिन्यात ३५० भटक्या कुत्र्यांना पकडले; २६० कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण पूर्ण

Raigad

९० कुत्र्यांचे निर्बीजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण बाकी; नगरपालिकेची मोहीम सुरू

पेण : प्रतिनिधी
पेण शहरातील भटक्या व उनाड कुत्र्यांचा वाढता वावर आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पेण नगरपालिकेकडून १ सप्टेंबरपासून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत एकूण ३५० भटक्या कुत्र्यांना पकडण्यात आले असून, त्यापैकी २६० कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित ९० कुत्र्यांवरील प्रक्रिया येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे.
पेण शहरातील कोळीवाडा नाका, देवआळी, कवंडाळ तलावाचा कोपरा, अंतोरा रोड, बौद्धवाडा, फणसडोंगरी, चावडी नाका, नंदीमाळ नाका तसेच विश्वेश्वर स्मशानभूमी परिसरात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन नगरपालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेची जबाबदारी मे. ओमकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पाथरी, जिल्हा परभणी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. संस्थेमार्फत भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया तसेच रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे.
या मोहिमेची माहिती पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. उर्वरित कुत्र्यांवरील निर्बीजीकरण व लसीकरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.