चिमुकलीच्या कवितेतून लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन!

Raigad

हमरापूर विभागातील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर; साक्षी मोकलचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चर्चेत

हमरापूर विभागातील खड्डेमय रस्त्यांच्या दुरवस्थेवर आता एका चिमुकलीनेच आपल्या कवितेतून लोकप्रतिनिधींना जाब विचारला आहे. कलवे येथील साक्षी निकेत मोकल या चिमुकलीने कलवे अॅक्सिस बँकेजवळील रस्त्याची दुर्दशा दाखवणारा व्हिडीओ आपल्या अनोख्या शैलीत तयार केला असून, तिच्या या व्हिडीओची समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे, पावसाळ्यात याच ठिकाणी हमरापूर विभागातील नागरिकांनी रस्त्याच्या प्रश्नासाठी ठिय्या आंदोलन केले होते. मात्र, आंदोलनानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याची नागरिकांची नाराजी आहे. नागरिकांच्या आंदोलनानंतरही न जागे झालेले लोकप्रतिनिधी आता एका चिमुकलीच्या कवितेने तरी जागे होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींसाठी साक्षीचा हा व्हिडीओ म्हणजे आरसा ठरला आहे. आता तरी संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलणार का, याकडे हमरापूर विभागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.