पेणमध्ये सेवा संकल्प अभियानाचे आयोजन

Raigad

विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश व प्रमाणपत्रांचे वाटप

पेण : प्रतिनिधी
पेण तहसील कार्यालयामार्फत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान सेवा संकल्प अभियान राबविण्यात आले. नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ, दाखले व शासकीय सेवा सुलभतेने उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा उद्देश होता.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कृषी सभापती वैकुंठ पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी संपूर्ण रायगड जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी मंत्रालय स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. केवळ एका तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करून रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पेण पंचायत समितीच्या सभापती स्मिता पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, प्रांताधिकारी प्रविण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, साकव संस्थेचे सचिव अरुण शिवकर, सभापती स्मिता पेणकर, नगरसेविका पल्लवी कालेकर, नगरसेवक मितेश शहा, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर व नितीन परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
या अभियानांतर्गत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, तर काही शेतकऱ्यांना टिल्लरचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमस्थळी विविध शासकीय विभागांचे स्टॉलही उभारण्यात आले होते. अभियान यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयाने विशेष मेहनत घेतली.
दरम्यान, या कार्यक्रमाला पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व इतर अधिकारी अनुपस्थित असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती. यावेळी कृषी सभापती वैकुंठ पाटील आणि तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.