https://www.youtube.com/watch?v=UD7M-mg_6T4

Raigad

पेण : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार सोहळ्यात पेण एज्युकेशन सोसायटीच्या सौ. म. ना. नेने कन्या विद्यालयातील दोन शिक्षिकांना राज्यस्तरीय गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षिका ज्योती पाटील (मुंबईकर मॅडम) आणि शिक्षिका अर्चना नेमाडे यांनी हा पुरस्कार प्राप्त केल्याने विद्यालयाच्या शिरपेचात दुहेरी मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पेण एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाच्या वतीने दोन्ही शिक्षिकांचे विशेष कौतुक करण्यात आले. यानिमित्ताने पेण एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयात नुकताच सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍड. मंगेश नेने, उपाध्यक्ष संजय कडू, मानद सचिव बाळासाहेब जोशी, संस्थेचे सदस्य अमित देव, श्रीराम दातार, डॉ. निता कदम, सौ. म. ना. नेने कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्हि.व्ही.पाटील, कार्यालयीन प्रमुख शंकर भट आदी उपस्थित होते.
दोन्ही शिक्षिकांनी आपल्या शैक्षणिक कार्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. राज्यस्तरीय पुरस्कारामुळे विद्यालयाच्या लौकिकात आणखी भर पडली असून, या यशाबद्दल शिक्षिका, मुख्याध्यापिका तसेच संपूर्ण विद्यालयाचे अभिनंदन करण्यात येत आहे.