वाशी येथे ८१ वर्षीय वृद्धाकडून गांजा जप्त; वडखळ पोलिसांची कारवाई

Crime
पेण : प्रतिनिधी
वाशी येथील सरपाटळ आळी परिसरात राहत्या घरातून गांजा बाळगल्याप्रकरणी वडखळ पोलिसांनी एका ८१ वर्षीय वृद्धाविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ८,४०० रुपये किमतीचा १६८ ग्रॅम गांजा जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊ नारायण म्हात्रे (वय ८१, रा. वाशी, सरपाटळ आळी, ता. पेण, जि. रायगड) यांच्या राहत्या घरात दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.२० वाजता पोलिसांनी कारवाई केली. यावेळी काळपट व हिरवट रंगाची पाने, फुले व फळे असलेला, काळ्या रंगाचा ओलसर व उग्र वास असलेला वनस्पतीसदृश पदार्थ आढळून आला. तपासणीअंती तो गांजा असल्याचे निष्पन्न झाल्याने तो जप्त करण्यात आला.
याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२७/२०२६ अन्वये गुंगीकारक औषध द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क), २०(ब) II (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव, वडखळ पोलीस ठाणे करीत आहेत.